ममता बॅनर्जींचा पंतप्रधानांवर पलटवार; म्हणाल्या, "परिवर्तन बंगालमध्ये नाही तर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 06:10 PM2021-03-07T18:10:55+5:302021-03-07T18:13:30+5:30
West Bengal Election 2021 : वन-ऑन-वन सामना करण्यासाठी तयार, ममता बॅनर्जींचं आव्हान
येत्या काही दिवसांत पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी आता भाजपनंही पूर्णपणे जोर लावण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसकडूनही आपला गड राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्यातील ब्रिगेड मैदानात सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी सिलिगुडीमध्ये एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीविरोधात पदयात्रा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पलटवार केला. पंतप्रधान मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. बंगालमध्ये परिवर्तन होणार असं म्हणतात. परंतु खरं परिवर्तन तर दिल्लीत होणार आहे असं म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.
"परिवर्तन आता बंगालमध्ये नाही तर दिल्लीत होणार आहे. ते म्हणाले बंगालमध्य महिला सुरक्षा नाही. परंतु उत्तर प्रदेश, बिहार आणि अन्य राज्यांकडे पाहा. बंगालमध्ये महिला सुरक्षितच आहेत. मी वन-ऑन-वन खेळण्यासाठी तयार आहे. जर त्यांना मतं खरेदी करायची असतील तर पैसे घ्या आणि तृणमूल काँग्रेसला आपलं मत द्या," असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी निशाणा साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकार सर्वकाही विकत असल्याचाही आरोप केला.
"केंद्र सरकारनं दिल्ली विकली, डिफेन्स, एअर इंडिया, बीएसएनएल अशा अनेक संस्थांना विकलं. उद्या जाऊन ते ताजमहालही विकतील. ते सोनार बांगला बनवू असं म्हणतात. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावावरील स्टेडियमही त्यांनी आपल्या नावे करून घतलं. कोरोना काळात मी फिरत होत पण मोदी कुठे होते? देशात एकच सिंडिकेट आहे आणि ते म्हणजे मोदी व अमित शाह. हे सिंडिकेट भाजपचंही ऐकत नाहीत. उज्ज्वला योजनेवर कॅगनं ठपका ठेवला आहे आणि त्यात गैरव्यवहार झाल्याचंही सांगितलं आहे," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
'Khela hobe'! We are ready to play. I am ready to play one-on-one... If they (BJP) want to buy votes, take the money and cast your vote for TMC: West Bengal Chief Minister Mamata Banerjee in Siliguri pic.twitter.com/fJ9yssMaIh
— ANI (@ANI) March 7, 2021
India knows about a syndicate that is Modi and Amit Shah's syndicate: West Bengal CM and TMC chief Mamata Banerjee in Siliguri https://t.co/OY3foZXeRVpic.twitter.com/uTyZl3nnzE
— ANI (@ANI) March 7, 2021
रॅलीदरम्यान पंतप्रधानांचा ममता बॅनर्जींवर निशाणा
"पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन आणण्यासाठी या ठिकाणच्या नागरिकांनी ममता बॅनर्जींवर भरवसा केला होता. परंतु त्यांनी हा भरवसा तोडला आहे. या लोकांनी बंगालचा अपमान केला आहे. या ठिकाणच्या मता-भगिनींवर अत्याचार केला आहे. यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकीकडे टीएमसी आहे, लेफ्ट-काँग्रेस आणि आहे आणि त्यांची बंगाल विरोधी वृत्ती आहे. तर दुसरीकडे स्वत: बंगालची जनता कंबर कसून उभी आहे. आज तुम्हा लोकांकडे पाहून कोणाच्याही मनात कोणतीही शंका येणार नाही. काही लोकांना तर आज २ मे आहे असंच वाटत असेल," असं मोदी म्हणाले.
विकासासाठी २४ तास मेहनत करू
"मी या ठिकाणी परिवर्तानाचा विश्वास घेऊन आलो आहे. बंगालच्या विकासाचा विश्वास घेऊन आलो आहे. बंगालमध्ये बदल घडवण्याचा, गुंतवणूक वाढवण्याचा, पुनर्निर्माणाचा विश्वास देण्यासाठी मी आलो आहे. या ठिकाणी तरूण, शेतकरी, उद्योजक, माता-भगिनी यांच्या विकासासाठी आम्ही २४ तास दिवसरात्र मेहनतीनं काम करु. आम्ही मेहनत करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही." असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.