येत्या काही दिवसांत पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी आता भाजपनंही पूर्णपणे जोर लावण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसकडूनही आपला गड राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्यातील ब्रिगेड मैदानात सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी सिलिगुडीमध्ये एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीविरोधात पदयात्रा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पलटवार केला. पंतप्रधान मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. बंगालमध्ये परिवर्तन होणार असं म्हणतात. परंतु खरं परिवर्तन तर दिल्लीत होणार आहे असं म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. "परिवर्तन आता बंगालमध्ये नाही तर दिल्लीत होणार आहे. ते म्हणाले बंगालमध्य महिला सुरक्षा नाही. परंतु उत्तर प्रदेश, बिहार आणि अन्य राज्यांकडे पाहा. बंगालमध्ये महिला सुरक्षितच आहेत. मी वन-ऑन-वन खेळण्यासाठी तयार आहे. जर त्यांना मतं खरेदी करायची असतील तर पैसे घ्या आणि तृणमूल काँग्रेसला आपलं मत द्या," असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी निशाणा साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकार सर्वकाही विकत असल्याचाही आरोप केला."केंद्र सरकारनं दिल्ली विकली, डिफेन्स, एअर इंडिया, बीएसएनएल अशा अनेक संस्थांना विकलं. उद्या जाऊन ते ताजमहालही विकतील. ते सोनार बांगला बनवू असं म्हणतात. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावावरील स्टेडियमही त्यांनी आपल्या नावे करून घतलं. कोरोना काळात मी फिरत होत पण मोदी कुठे होते? देशात एकच सिंडिकेट आहे आणि ते म्हणजे मोदी व अमित शाह. हे सिंडिकेट भाजपचंही ऐकत नाहीत. उज्ज्वला योजनेवर कॅगनं ठपका ठेवला आहे आणि त्यात गैरव्यवहार झाल्याचंही सांगितलं आहे," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
विकासासाठी २४ तास मेहनत करू"मी या ठिकाणी परिवर्तानाचा विश्वास घेऊन आलो आहे. बंगालच्या विकासाचा विश्वास घेऊन आलो आहे. बंगालमध्ये बदल घडवण्याचा, गुंतवणूक वाढवण्याचा, पुनर्निर्माणाचा विश्वास देण्यासाठी मी आलो आहे. या ठिकाणी तरूण, शेतकरी, उद्योजक, माता-भगिनी यांच्या विकासासाठी आम्ही २४ तास दिवसरात्र मेहनतीनं काम करु. आम्ही मेहनत करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही." असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.