West Bengal Election 2021: "ममता दीदी नंदीग्राममध्ये पराभूत होतायत", अमित शहांनी जाहीर सभेत थेट भविष्यवाणीच केली!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 03:28 PM2021-04-02T15:28:04+5:302021-04-02T15:28:50+5:30
West Bengal Election 2021, Amit Shah: "ममता दीदी पश्चिम बंगालमध्ये हुकुमशाही आणि एकाधिकारशाहीनं सरकार चालवत आहेत", अमित शहा बरसले.
West Bengal Election 2021, Amit Shah: "ममता दीदी पश्चिम बंगालमध्ये हुकुमशाही आणि एकाधिकारशाहीनं सरकार चालवत आहेत. पण केंद्रातील मोदी सरकार विकास, विश्वास आणि व्यापाराच्या मुद्द्यावर सरकार चालवत आहे", असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आज पश्चिम बंगालच्या कूच बिहार येथील जाहीर सभेत म्हणाले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कूच बिहार जिल्ह्यातील सीतलकूची येथील रॅलीमध्ये अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला केला. (Amit Shah Claims Mamata Banerjee Going Lost In Nandigram)
ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या जनतेसोबत नेहमीच अन्याय केला आहे. भाजप पश्चिम बंगालच्या विकासाठी दरवर्षी २ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. ममता दीदी नंदीग्राममध्ये पराभूत होणार आहेत असाही दावा शहा यांनी यावेळी केला.
"दीदींच्या मनात जनतेची चिंता नाहीय. तर त्यांच्या मनात त्यांच्या भाच्याची चिंता आहे. त्या त्यांच्या भाच्याला मुख्यमंत्री करू पाहताहेत. भाच्याच्या कल्याणावर त्यांचा विश्वास आहे आणि मोदीजी प.बंगालमधील जनतेच्या कल्याणासाठी झटणारे नेते आहेत", असं अमित शहा म्हणाले.
ममता बॅनर्जी यांनी प.बंगालला मागासलेलं ठेवलं असाही आरोप त्यांनी यावेळी केला. "दीदींनी ना रस्त्यांवर लक्ष दिलं, ना कनेक्टिव्हिटीवर, ना आरोग्यावर. आज पश्चिम बंगालमध्ये तंबाखूचं उत्पादन चांगलं होतंय. पण त्याचा शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी ममता दीदींनी काहीच केलं नाही", अशी टीका शहा यांनी केली आहे.
नंदीग्राममध्ये ममता दीदी होणार पराभूत?
अमित शहा यांनी यावेळी नंदीग्राम मतदार संघाबाबत भविष्यवाणीच करुन टाकली. "दीदींनी प.बंगालमधील जनतेसोबत नेहमीच अन्याय केला आहे. म्हणूनच त्या आता तुम्हाला घाबरत आहेत. काल नंदीग्रामनं दाखवून दिलं आहे की त्या आता पराभूत होणार आहेत. त्यांच्या सल्लागारानं दीदींना विचारलंय की आता तुम्ही कुठून लढणार? त्यावर दीदी म्हणाल्या की, बंगालचा उत्तर भाग वगळून मला इतर कुठूनही लढू द्या. हे उत्तर बंगालचे लोक मला जिंकवणार नाहीत", असा खळबळजनक खुलासा अमित शहा यांनी भर सभेत केला आहे.