West Bengal Election 2021: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालात तृणमूल काँग्रेस पक्षानं बहुमताचा आकडा गाढला असला तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदार संघात पराभव झाला आहे. भाजपच्या शुभेंदू अधिकारी यांच्याविरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत ममता बॅनर्जी यांचा निसटता पराभव झाला आहे. खुद्द ममता बॅनर्जी यांनीही नंदीग्राममधील पराभव मान्य केला आहे. (West Bengal Election 2021 Mamta banerjee lost the Nandigram seat shubhendu adhikari won)
नंदीग्रामच्या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. अपेक्षेप्रमाणे या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर ममता बॅनर्जी आणि शुभेंदु अधिकारी यांच्यात आघाडी-पिछाडीचा खेळ सुरूच होता. एक वेळ तर ममता बॅनर्जी यांचा विजय झाल्याचीही माहिती समोर आली होती. पण अखेरच्या फेरीनंतर शुभेंदु अधिकारी यांनी १९५६ मतांनी बाजी मारली आहे. त्यामुळे प.बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी नंदीग्रामच्या लढतीत मुख्यमंत्री ममता दीदी यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
"प.बंगालचा आज विजय झाला आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. आज प.बंगालनं देशाला वाचवलंय आणि नंदीग्रामचा निकाल मी मान्य करते", असं विधान ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.
"नंदीग्रामची चिंता करु नका, मी नंदीग्राममध्ये संघर्ष केला कारण मी एक चळवळ लढत होते. नंदीग्रामच्या जनतेने दिलेला निकाल मी मान्य करते. आम्ही यंदा २२१पेक्षा जास्त जागा जिंकलो आहोत आणि भाजपचा पराभव झाला आहे", असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.