बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या मिथुन चक्रवर्ती यांचा यापूर्वीचा राजकीय प्रवास हा फारच छोटा होता. चार वर्षांच्या राजकीय सन्यासानंतर त्यांनी रविवारी पुन्हा राजकारणात येत भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जात होते. तसंच ते तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेवरही गेले होते. २०११ मध्ये ममता बॅनर्जी यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली होती. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी मिथुन चक्रवर्ती यांना राजकारणात प्रवेश करण्याचं निमंत्रण दिलं. त्यावेळी मिथुन चक्रवर्ती यांनीदेखील ते स्वीकारलं. २०१४ मध्ये तृणमूल काँग्रेसकडून मिथुन चक्रवर्ती हे राज्यसभेवरही पोहोचले. परंतु आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी केवळ तीन वेळाच राज्यभेत उपस्थिती लावली होती. २०१५-१६ मध्ये शारदा चिटफंड घोटाळ्यात मिथुन चक्रवर्ती यांचं नाव जोडलं गेलं, त्यानंतर डिसेंबर २०१६ मध्ये त्यांनी आपला राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी राजकारणापासून लांबच राहणं पसंत केलं. परंतु चार वर्षांनंतर आता पुन्हा एकदा त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी मिथुन चक्रवर्ती यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते राजकारणात प्रवेश करतील अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. शनिवारी रात्री भाजपचे राज्याचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी कोलकात्यातील बेलगाचिया या ठिकाणी मिथुन चक्रवर्ती यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्या प्रवेशाचं चित्र स्पष्ट झालं होतं.शारदा कंपनीचे ब्रँड अँबेसेडर मिथुन चक्रवर्ती हे शारदा कंपनी ब्रँड अँबेसेडर होते. अंमलबजावणी संचालनालयानं त्यांची या प्रकरणी चौकशीही केली होती. त्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी जवळपास १.२० कोटी रूपये परत केले होते. तसंच आपल्याला याच्याशी जोडलं जायचं नसल्याचंही म्हटलं होतं. तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होण्यापूर्वी डाव्या पक्षांच्या सरकारदरम्यान मिथुन चक्रवर्ती यांना तत्कालिन क्रीडा मंत्री सुभाष चक्रवर्ती यांचे निकटवर्तीय मानलं जात होतं. परंतु त्यांनी जेव्हा ममता बॅनर्जींच्या पक्षासह जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. परंतु आता पुन्हा एकदा त्यांच्या निर्णयानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
अडीच वर्षात मिथुन चक्रवर्तीं केवळ ३ दिवस चढले होते संसदेची पायरी; नंतर राजकारणाला ठोकला होता रामराम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2021 7:34 PM
West Bengal Election 2021 : चार वर्षांच्या राजकीय सन्यासानंतर पुन्हा केला राजकारणात प्रवेश, हाती घेतला भाजपचा झेंडा
ठळक मुद्देचार वर्षांच्या राजकीय सन्यासानंतर पुन्हा केला राजकारणात प्रवेशरविवारी हाती घेतला भाजपचा झेंडा