पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. येत्या २७ मार्च रोजी राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यात राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षानं पुन्हा एकदा विजयाची तयारी केलीय, तर भाजपनं यंदा २०० जागांवर विजय प्राप्त करणार असल्याचा दावा केला आहे.
पश्चिम बंगालमधील निवडणुकीत यावेळी खासदारांपासून ते स्टार कलाकारांपासून अनेकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आलं आहे. यातच खरगपूर विधानसभा मतदार संघ देखील सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या मतदार संघात भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा खास मित्र प्रदीप सरकार हे तृणमूलच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांची लढत भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत असलेल्या अभिनेते हिरण चटर्जी यांचं आव्हान असणार आहे.
खरगपूर हे नाव रेल्वे स्थानकामुळे चर्चेत राहिलं आहे. सर्वात लांब रेल्वे स्टेशनच्या यादीत खरगपूर स्थानक भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशमधून येणाऱ्या कामगारांसोबतच रेल्वेसाठी काम करणारे आंध्र प्रदेशातील लाखो लोक खरगपूरच्या जवळ राहतात.
महेंद्रसिंग धोनी जेव्हा खरगपूर रेल्वे स्थानकावर टीसीचं काम करत होता आणि २०० ते ३०० रुपयांसाठी टेनिस बॉल क्रिकेट खेळत होता तेव्हा प्रदीप सरकार हे धोनीचे जवळचे मित्र राहिले आहेत. खरगपूर मतदार संघात यंदा भाजपचे हिरण चटर्जी आणि प्रदीप सरकार यांच्यात मुख्य लढत असणार आहे.