कोलकाता: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार टिकवण्यासाठी भाजपनं ताकद पणाला लावली आहे. यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठीही भाजपनं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपनं गेल्या काही महिन्यांपासूनच जोर लावला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहे.विधानसभा निवडणुकीत भाजप बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून उतरवणार असल्याची चर्चा बऱ्याच कालावधीपासून सुरू आहे. मात्र गांगुली सध्या तरी तरी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यास उत्सुक नसल्याचं कळतं आहे. मी राजकारणात उतरणार नाही आणि विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी प्रचारदेखील करणार नाही, असं गांगुली यांनी भाजपच्या नेतृत्त्वाला कळवलं असल्याचं वृत्त 'द टेलिग्राफ'नं दिलं आहे.मला सक्रिय राजकारणात उतरण्यात रस नसल्याचं सौरव गांगुली यांनी गेल्या महिन्यात भाजपला सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे. 'मी सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून काम करत आहे. मी माझ्या कामाबद्दल समाधानी आहे. त्यात मी खूष आहे,' असं गांगुली यांनी भाजप नेतृत्त्वाला कळवलं. गांगुली यांनी त्यांचं मत स्पष्ट केल्यानंतर भाजपनं त्यांच्यावर कोणताही दबाव आणलेला नाही, असंदेखील 'द टेलिग्राफ'नं आपल्या वृत्तात नमूद केलं आहे.राज्यात सौरव गांगुली यांनी भाजपसाठी महत्त्वाची भूमिका बजवावी, यासाठी पक्षाकडून बरेच प्रयत्न सुरू होते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. 'सौरव गांगुली यांनी पक्षासाठी काम करावं यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र सध्या ते दुसऱ्या भूमिकेत व्यग्र आहेत. गेल्या काही महिन्यांत बंगालमधील स्थिती खूप बदलली आहे. पक्षानं राज्यात खूप मोठी ताकद कमावली आहे,' असं सुत्रांनी सांगितलं.पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या सामर्थ्यात वाढ२०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं २९५ पैकी २११ जागा जिंकल्या. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत २७ जागा अधिक जिंकत ममता बॅनर्जी मुख्यमंत्रिपदी कायम राहिल्या. या निवडणुकीत भाजपनं ३ जागांवर विजय मिळवला. मात्र २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं प्रचंड मोठी मुसंडी मारली. २०१४ मध्ये अवघ्या २ जागा जिंकणाऱ्या भाजपनं गेल्या वर्षी तब्बल १८ जागा जिंकल्या. याचा थेट फटका तृणमूलला बसला. २०१४ मध्ये ३४ जागा जिंकणाऱ्या ममतांना २०१९ मध्ये २२ जागांवर समाधान मानावं लागेल.
West Bengal Election 2021: बंगालमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार होणार का?; सौरव दादानं भाजपला स्पष्टच सांगितलं
By कुणाल गवाणकर | Published: November 03, 2020 2:00 PM