पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान, दार्जिलिंग येथे आयोजित एका रॅलीदरम्यान अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यांनी यावेळी तृणमूल काँग्रेस कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. "दीदी (ममता बॅनर्जी) मला बाहेरील म्हणतात. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाहेरील संबोधतात. पण मी सांगतो बाहेरील कोण आहेत. कम्युनिस्ट विचारसरणी बाहेरील आहे. ती रशिया आणि चीनमधून आली आहे. काँग्रेसचं नेतृत्व बाहेरील असून ते इटलीमधून आलं आहे. तृणमूल काँग्रेसची व्होटबँक बाहेरील असून घुसखोर आहेत," असं म्हणत शाह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. इतकंच नव्हे तर दार्जिलिंगमध्ये गोरखा समाजाला शुभेच्छा देताना अमित शाह यांनी भाजप आपल्या सन्मानासाठी कोणाशीही लढायला तयार असल्याचं म्हटलं. "गोरखा आणि नेपाळी बांधवांनो जर कोणी तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असेल तर घाबरू नका. गोरखा आणि नेपाळी समाजाच्या सन्मानासाठी भाजप कोणाशीही लढू शकते," असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी गोरखा समुदाच्या ११ जातींना एसटी प्रवर्गाचा दर्जा देण्याचंही आश्वासन दिलं. दरम्यान, ममता बॅनर्जी यांना हटवून भाजपचा मुख्यमंत्री निवडा, पक्ष गोरखा समजातील ११ जातींना एसटीचा दर्जा देईल, असंही ते म्हणाले.
West Bengal Election : काँग्रेस नेतृत्व इटलीचं, कम्युनिस्ट विचार रशिया-चीनचे आणि दीदींचे मतदार घुसखोर; अमित शाहंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 4:57 PM
अमित शाहंनी ममता बॅनर्जींवर साधला निशाणा, ममता बॅनर्जींचे मतदार घुसखोर, अमित शाहंची टीका
ठळक मुद्देअमित शाहंनी ममता बॅनर्जींवर साधला निशाणा ममता बॅनर्जींचे मतदार घुसखोर, अमित शाहंची टीका