पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राम येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जखमी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्यावर हल्ला झाला असल्याचा दावा केला होता. दरम्यान, त्यांच्यावर हल्ला झाल्याचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचा अहवाल निरीक्षकांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. निवडणूक आयोगानं विवेक दुबे आणि अजय नायक यांना अहवाल सोपवण्याचे आदेश दिले होते. चार पाच लोकांनी आपल्यावर हल्ला केला होता असा दावा पायाला झालेल्या दुखापतीनंतर ममता बॅनर्जी यांनी केला होता.निरीक्षकांनी ममता बॅनर्जी यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्याच्या शक्यता नाकारल्या असल्याचं अहवालात म्हटल्याचं इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे. 'आम्हाला ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. ज्यावेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली त्यावेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस उपस्थित होते,' असं त्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. शनिवारी निवडणूक आयोगानं पश्चिम बंगाल सरकारचा अहवाल अपूर्ण असल्याचं म्हणत मुख्य सचिव अलापन बंडोपाध्याय यांना रविवारपर्यंत विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेनंतर निवडणूक आयोगानं दोन निरीक्षकांची नियुक्ती केली होती. स्पेशल पोलीस ऑब्झर्व्हर विवेक दुबे आणि स्पेशल ऑब्झर्व्हर अजय नायक यांनी शनिवारी घटनास्थळाची पाहणी केली. तसंच यानंतर निवडणूक आयोगाला आपला अहवाल पाठवून दिला. पश्चिम बंगाल सरकारनं दिलेल्या माहितीनुसार नंदीग्राम येथे १० मार्च रोजी ममता बॅनर्जी यांना गाडीच्या दरवाज्यामुळे दुखापत झाली. परंतु त्यांच्या पायाला गाडीचा दरवाजा कसा लागला याबाबत मात्र माहिती देण्यात आली नव्हती. सरकारच्या या अहवालात ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत कशी झाली याबाबत कोणतीही माहिती नसल्याचं निवडणूक आयोगाला दिसून आलं. व्हिलचेअरवरून प्रचार करणारनंदीग्राममधील हल्ल्यात जखमी झालेल्या आणि पायात प्लॅस्टर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपण येत्या काही दिवसांतच पुन्हा प्रचारात सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं होतं. प्रसंगी व्हीलचेअरवरून प्रचार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ममता बॅनर्जी यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांच्या रक्तातील सोडियमचं प्रमाण कमी झालं आहे. त्यांच्या डाव्या घोट्याला तसेच उजवा खांदा, हात, गळा व मानेलाही जखमा झाल्या आहेत. त्यांच्या पायाला प्लॅस्टर घातलं आहे, असं डॉक्टरांनी यापूर्वी सांगितलं होतं.
West Bengal Election : ममता बॅनर्जींवर हल्ला झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत; निरीक्षकांनी पाठवला अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 9:26 PM
West Bengal Election : बुधवारी ममता बॅनर्जींच्या पायाला झाली होती दुखापत. चार पाच जणांनी हल्ला केल्याचा ममता बॅनर्जी यांनी केला होता दावा.
ठळक मुद्देबुधवारी ममता बॅनर्जींच्या पायाला झाली होती दुखापत.चार पाच जणांनी हल्ला केल्याचा ममता बॅनर्जी यांनी केला होता दावा.