पुढील काही दिवसांत पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. एकीकडे तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये आपला गड राखण्याचे प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे भाजपही आपली ताकद वाढवण्याच्या तयारीत आहे. सध्या दोन्ही बाजूनं एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. अशातच पश्चिम बंगालमध्ये आलेल्या पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. तसंच ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत तृणमूलच्या कार्यकर्त्यांना गुंड म्हटलं होतं. आता ममता बॅनर्जी यांनी पलटवार करत भाजप उत्तर प्रदेशातून गुंड मागवत असल्याचं म्हणत जोरदार निशाणा साधला. ममता बॅनर्जी यांनी विष्णूपूर येथील रॅलीत जनतेला संबोधित केलं. "पान मसाला खाणारे आणि टिळा लावणाऱ्या लोकांना उत्तर प्रदेश सारख्या राज्यातून निवडणुकीपूर्वी समस्या निर्माण करण्यासाठी पाठवलं गेलं. ते आमच्यासाठी बाहेरील गुंड आहेत. आम्ही अनेक वर्षांपासून बंगालमध्ये राहत आहोत आम्ही अन्य राज्यातील लोकांवर बाहेरचे असण्याचा ठपका लावत नाही," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
मोदींचा सन्मान करत होते, पण....ममता बॅनर्जी यांनी बुधवारी रॅलीदरम्यान बोलताना पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना खोटी व्यक्ती म्हटलं. तसंच भाजप बाहेरील राज्यातून गुंड आणत असल्याचा आरोपही केला. "यापूर्वी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करत होते. परंतु ते असे असतील हे माहित नव्हतं. मी पंतप्रधान मोदींसारखी खोटी व्यक्ती पाहिली नाही. नरेंद्र मोदी खोटं बोलतात हे म्हणतानाही आपल्याला खेद वाटत आहे. कोण गुंड आहेत? आज उत्तर प्रदेशात भाजपच्या त्रासामुळे आयपीएस अधिकारी आपली नोकरी सोडत आहेत," असंही त्या म्हणाल्या.मोदी, शाह, अदानी लुटणारभाजप पश्चिम बंगालची संस्कृती नष्ट करण्यासाठी उत्तर प्रदेशातून गुंज आणत आहे, असा आरोपही बॅनर्जी यांनी यावेळी केला. शेतकरी मोठ्या कालावधीपासून सस्त्यावर आहे. हे मोदी, अमित शाह आणि अदानी या तीन सिंडीकेट्समुळे आहे. अदानी सर्व पैसा आणि उत्पादन लुटतील. केवळ अदानी, मोदी आणि शाहंनाचं खाणं मिळेल आणि बाकी जनता रडत राहिल, असंही त्या म्हणाल्या. "पंतप्रधान मोदींनी सर्वांना १५ लाख रूपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु त्यांनी कोणाला काही दिलं? तर आता १५ लाख रूपये नाही तर भाजपला मतही नाही. भाजपनं सांगितलं मुलींना शिकवा, मुलींना वाचवा, परंतु ते एकही रूपया खर्च करत नाही. आमचं सरकार सर्व मुलींना १००० ते २५०० रूपये शिष्यवृत्ती देत आहे," असंही ममता बॅनर्जींनी यावेळी नमूद केलं.