West Bengal Election Result 2021: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला दोनशेहून अधिक जागांवर आघाडी मिळाली आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपला धूळ चारल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत ममता दीदींचे अभिनंदन केले आहे. यासोबतच पवार यांनी एक महत्वपूर्ण संकेत देखील दिला आहे.
"तृणमूल काँग्रेसच्या विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरू ठेवुयात. तसेच कोरोनाच्या संकटाचाही मिळून सामना करुयात", असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे. (West Bengal Election Result 2021 ncp chief sharad pawar tweet congratulated mamata banerjee)
देशातील पाच राज्यांच्या निवडणूक निकालांची घोषणा आज होत आहे. यातील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. कारण या ठिकाणी ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप असा लढा पाहायला मिळाला होता. मतमोजणीच्या सध्याच्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचीच सत्ता येणार असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. तृणमूल काँग्रेस सध्या २०७ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप ८१ जागांवर आघाडी प्राप्त करु शकला आहे.
पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील पश्चिम बंगालमध्ये जोरदार प्रचार करत होते. पण याचा काहीच फायदा झालेला दिसत नाही. ममता बॅनर्जी यांनी भाजपचा सुपडासाफ केल्याचं दिसून येत आहे.