West Bengal Election Result 2021: अमित शहांबद्दल फारसा आदर वाटत नाही, कारण...; प्रशांत किशोर यांचा सॉल्लिड पंच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 14:44 IST2021-05-03T13:35:25+5:302021-05-03T14:44:47+5:30
West Bengal Election Result 2021: २०० जागा जिंकून म्हणणाऱ्या भाजपला बंगालमध्ये १०० जागाही मिळाल्या नाहीत; प्रशांत किशोर यांचा अंदाज खरा ठरला

West Bengal Election Result 2021: अमित शहांबद्दल फारसा आदर वाटत नाही, कारण...; प्रशांत किशोर यांचा सॉल्लिड पंच
नवी दिल्ली: पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विधानसभा निवडणूक विजयाची हॅटट्रिक केली. भारतीय जनता पक्षानं गेल्या काही महिन्यांपासून बंगालमध्ये पूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी झंझावाती प्रचार सभा घेऊन, भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बंगालमध्ये तळ ठोकूनही भाजपला शंभरी गाठता आली नाही. दोनशे जागा जिंकू अशी दर्पोक्ती भाजप नेत्यांनी केली होती. तर भाजपला १०० जागादेखील मिळणार नाहीत, असा अंदाज निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी वर्तवला होता. त्यांचा अंदाज अगदी अचूक ठरला.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला धक्का दिला होता. त्यानंतर ममता बॅनर्जी अस्वस्थ होत्या. त्यांनी मला फोन करून तातडीनं येण्यास सांगितलं, असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीनंतर तृणमूलनं आपली रणनीती बदलली. ही रणनीती भाजपच्या फारशी लक्षात आली नाही. थेट लोकांशी जोडले जाणारे कार्यक्रम तृणमूलनं हाती घेतली. जमिनीवर अधिकाधिक काम सुरू केलं, असं किशोर यांनी 'द टेलिग्राफ'ला सांगितलं.
आता थांबायचंय, आयुष्यात दुसरं काहीतरी करेन; प्रशांत किशोर यांची 'राजनीती' सोडण्याची घोषणा
बंगालमध्ये अमित शहांनी जातीय लक्ष घातलं होतं. मात्र तरीही भाजपला शंभरी गाठता आली नाही. या पार्श्वभूमीवर किशोर यांनी शहांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. 'कदाचित माझ्या बोलण्यात तुम्हाला अहंकार वाटू शकेल. पण मला अमित शहा ओव्हर रेटेड राजकीय आणि निवडणूक मॅनेजर वाटतात. त्यांनी आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये कोणतं व्यवस्थापन कौशल्य दाखवलं?', असा थेट सवाल किशोर यांनी उपस्थित केला.
गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचा करिश्मा आहे. त्यांच्या हाताशी खूप संसाधनं आहेत. संघ आणि पक्षाचं मोठं नेटवर्क त्यांच्याकडे आहे. त्यांच्यामागे सरकार आणि सरकारी यंत्रणादेखील भक्कमपणे उभ्या आहेत. निवडणूक आयोगचे निर्णयदेखील त्यांच्या पथ्यावर पडणारे होते आणि तरीही ते हरले. यावरून तुम्हाला अमित शहांच्या नावलौकिकाची, प्रतिष्ठेची कल्पना येईल, असा टोला त्यांनी लगावला.
पश्चिम बंगालची निवडणूक आम्ही मोठ्या फरकानं जिंकू याबद्दल मला विश्वास होता, असं किशोर म्हणाले. अमित शहा आणि भाजपचं नेमकं काय चुकलं हेदेखील त्यांनी सांगितलं. 'प्रोपॅगेंडा तुम्हाला निवडणूक जिंकवून देऊ शकत नाही. भाजप नेत्यांमध्ये विशेषत: अमित शहांमध्ये खूप मग्रुरी दिसत होती. ते आकाशात उडत होते. त्यामुळे ते जमिनीपासून दूर गेले. आम्ही विजयी होणार आहोत, असं जाहीर करून ते लढायला आले. मात्र त्या केवळ पोकळ बाता होत्या,' अशा शब्दांत किशोर यांनी शहांसह भाजपवर टीका केली.