कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विधानसभा निवडणूक विजयाची हॅटट्रिक केली. भारतीय जनता पक्षानं गेल्या काही महिन्यांपासून बंगालमध्ये पूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी झंझावाती प्रचार सभा घेऊन, भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बंगालमध्ये तळ ठोकूनही मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या नेतृत्त्वाखाली तृणमूल काँग्रेसनं दोनशेहून अधिक जागा जिंकल्या. यानंतर आज ममता यांनी पक्षाच्या मुख्यालयात नेत्यांशी संवाद साधला.ममता बॅनर्जींच्या तृणमूलनं राज्यात दोनशेपेक्षा जास्त जागा जिंकल्या असल्या तरी खुद्द ममतांना मात्र नंदिग्राममध्ये पराभूत व्हावं लागलं. याबद्दल ममता यांनी एक धक्कादायक दावा केला. 'नंदिग्राममध्ये पुन्हा मतमोजणी झाल्यास आपल्या जीवाला धोका असेल, अशी भीती तिथल्या रिटर्निंग ऑफिसनं व्यक्त केली होती. मला एसएमएसच्या माध्यमातून ही माहिती समजली. तिथला सर्व्हर चार तास डाऊन होता,' असं बॅनर्जी म्हणाल्या.मी आधीपासूनच जमिनीवर राहून लढत आले आहे. लोकांनीदेखील भाजपच्या विरुद्ध लढावं यासाठी मी त्यांना प्रोत्साहन देऊ शकते. कारण सगळं काही मी एकटी करू शकत नाही. २०२४ मध्ये आपण एकत्र येऊन लढा देऊ. पण त्याआधी कोरोनाच्या संकटाचा सामना करू, असं ममता बॅनर्जींनी म्हटलं. यापुढे सगळे पत्रकार कोरोना योद्ध असतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली. कोणीही हिंसाचार घडवू नये. राज्यात शांतता कायम राखावी. भाजप आणि केंद्रीय यंत्रणांनी आपल्याला त्रास दिला आहे. पण तरीही आपण शांतता आणि सुव्यवस्था कायम राखायला हवी, असं आवाहन त्यांनी जनतेला केलं.