मुंबई - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee) यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. (West Bengal Election Result 2021) अनेक राजकीय तज्ज्ञ आणि एक्झिट पोलचे अंदाज चुकवत तृणमूल काँग्रेसने दोनशेहून अधिका जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला १०० च्या आतच समाधान मानावे लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या झालेल्या पराभवाचं कारण सांगितले आहे.
त्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये भाजपाला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. येथे भाजपाला रोखण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले होते. बंगालमध्ये एकेकाळी निर्विवाद सत्ता राखणारे डावे आणि जास्त जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचे संख्याबळ मर्यादित राहिलेले दिसते. बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्यांनी तृणमूल काँग्रेससोबच अघोषित आघाडी केल्याचे दिसून आहे. काँग्रेस आणि डाव्यांनी आपली मते तृणमूलच्या पारड्यात टाकली, त्यामुळे भाजपाच्या जागा कमी झाल्या असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस २०२ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपाला आतापर्यंत ७८ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर काँग्रेस केवळ एका जागेवर आघाडीवर आहे.