West Bengal Election Result 2021: भाजप-तृणमूलमध्ये टशन, पण एका माणसाला वेगळंच टेन्शन; 'नोकरी' जाणार की राहणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 12:28 PM2021-05-02T12:28:15+5:302021-05-02T12:30:06+5:30
West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: मोदी-शहांच्या झंझावातानंतरही तृणमूल २०० हून अधिक मतदारसंघात आघाडीवर; भाजप ८३ मतदारसंघात पुढे
कोलकाता: देशातील पाच राज्यांमधील निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मतमोजणीला सुरुवात होऊन तीन तास झाले असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं मुसंडी मारली आहे. सुरुवातीला भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमध्ये कडवी लढत बघायला मिळत होती. मात्र आता तृणमूलनं जवळपास २०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर तासाभरापूर्वी १०० च्या पुढे गेलेला भाजप आता ८० च्या जवळ येताना दिसत आहे.
मोदी-शहांच्या झंझावातानंतरही बंगालमध्ये तृणमूल टेचात; पण ममता दीदी मोठ्या पेचात
भाजपनं बंगालमध्ये ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांसह भाजपशासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्री बंगालमध्ये प्रचाराला उतरले होते. मात्र तरीही भाजपला अपेक्षित जागा मिळताना दिसत नाहीत. त्यामुळे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या एका दाव्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तृणमूलचे निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करत असलेल्या प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी सत्ता राखतील, असा दावा केला होता. भाजपला बंगालमध्ये १०० हून अधिक जागा मिळणार नाहीत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
बंगालमध्ये वेगळाच खेला होबे! भाजपवर उलटतेय VIP खेळी; रिकामी राहणार दिग्गजांची झोळी?
तासाभरापूर्वी भाजपनं बंगालमध्ये शंभरच्यावर मतदारसंघात आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर त्यांचा आकडा खाली येत गेला. आता तो ८३ वर येऊन पोहोचला आहे. हात कल कायम राहिल्यास प्रशांत किशोर यांचा अंदाज अचूक ठरू शकतो. बंगालमध्ये भाजपला १०० हून अधिक जागा मिळाल्यास मी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करणं बंद करेन आणि दुसरं काहीतरी काम सुरू करेन, असं किशोर म्हणाले होते. बंगालमध्ये भाजपनं १०० पेक्षा अधिक जागा जिंकल्यास तुम्ही मला दुसरं काहीतरी काम करताना बघाल. पण निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करताना मी तुम्हाला कधीही दिसणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.