नवी दिल्ली - संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Election Result 2021) तृणमूल काँग्रेसने (TMC) मुसंडी मारली आहे. सुरुवातीला भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमध्ये कडवी लढत बघायला मिळत होती. मात्र आता तृणमूलनं जवळपास 200 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर तासाभरापूर्वी १०० च्या पुढे गेलेला भाजप आता ८० च्या जवळ येताना दिसत आहे. याच दरम्यान आता समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) आणि भाजपाला (BJP) सणसणीत टोला लगावला आहे.
पश्चिम बंगालच्या जनतेनं 'दीदी ओ दीदी'चं जबरदस्त उत्तर दिलंय असं म्हणत अखिलेश यांनी निशाणा साधला आहे. तसेच ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "पश्चिम बंगालमध्ये भाजपा द्वेषाचं राजकारण पराभूत करणारी जागरूक जनता, आक्रमकपणे लढा देण्याऱ्या ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा. भाजपाने एका महिलेवर खालच्या पातळीवर केलेल्या टीकेचं जनतेनं दिलेलं उत्तर आहे. 'दीदी ओ दीदी'ला चोख प्रत्युत्तर दिलं आहे" असं अखिलेश यांनी म्हटलं आहे.
भाजप आणि तृणमूलमध्ये जोरदार टक्कर होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. दोन दिवसांपूर्वी मतदान संपल्यानंतर आलेले एक्झिट पोल्सचे आकडे हेच दाखवत होते. पण प्रत्यक्षात मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी एकहाती लढत देत भाजपचे सत्ताबदलाचे मनसुबे धुळीस मिळवले. ममता बॅनर्जींचा तृणमूल पक्ष सध्या २०० पेक्षा अधिक मतदारसंघांत आघाडीवर असल्यानं सर्व एक्झिट पोल्स चुकले आहेत. एकाही एक्झिट पोल्सनं ममतांच्या पक्षाला २०० पेक्षा अधिक जागा मिळतील आणि भाजप १०० च्या खाली राहील असा अंदाज वर्तवलेला नव्हता.
पक्षांनी जल्लोषाचा आदेश धुडकावला; निवडणूक आयोगाकडून कारवाईचे आदेश
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे निवडणूक आयोगाने पाच राज्ये आणि लोकसभा विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये निकालानंतर कोणताही जल्लोष न करण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीदेखील तामिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर जल्लोष सुरु झाला आहे. यामुळे निवडणूक आयोगाने राज्यांच्या सचिवांनाच आदेश जारी केले आहेत. जे कोणी निर्बंधांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर एफआयआर दाखल करावा, तसेच ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जल्लोष केला जात असेल त्या पोलीस ठाण्याच्या मुख्य अधिकाऱ्याचे निलंबन करावे असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच अशा प्रकारच्या प्रत्येक घटनेचा अहवाल आयोगाकडे तातडीने सोपवावा असेही म्हटले आहे.