कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी(West Bengal Elections 2021) सर्वच पक्ष आपापली पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यातच यंदा ममता बॅनर्जी यांना सर्वात मोठं आव्हान भाजपाकडून(BJP) दिलं जात आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने त्यांची सर्व ताकद पणाला लावली आहे.
क्रिकेटपासून फिल्मी जगतातील अनेकांना पक्षात सामावून घेण्यात भाजपाला यश आलं आहे. गुरुवारी पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध अभिनेत्री पायल सरकार(Famous Actress Payal Sarkar Joined BJP) हिने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला, कोलकातामधील एका कार्यक्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
कोण आहे पायल सरकार?
पायल ही टॉलिवूड सिनेमातील प्रमुख अभिनेत्री आहे, अलीकडेच तिने मिर्च ३ आणि हेचही यात काम केलंय, पायलने सुरुवातीला तिचं करिअर मॉडेलिंगमधून सुरू केलं, त्यानंतर बंगाली सिनेमांमध्ये पायलने तिच्या अभिनयाची छाप पाडली, करिअरच्या सुरुवातीला पायलने २००६ मध्ये बिबर नावाचा पहिला सिनेमा केला, तिने आतापर्यंत अनेक सिनेमे केले आहेत, बरेच पुरस्कारही तिच्या नावावर आहेत. मनोरंजन क्षेत्रात स्वत:चं नाव कमवल्यानंतर आता पायलने राजकीय क्षेत्रात उडी घेतली आहे.
पायल सरकार पॉप्युलर बंगाल मॅग्जिन उनिश कुरीच्या कव्हर पेजवरही झळकली आहे, २०१० मध्ये ‘ले चक्का’साठी तिला सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे, २०१६ मध्येही जामेर राजा दिलो बोर नावाच्या चित्रपटासाठीही तिला पुन्हा सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
क्रिकेटर्सची राजकीय इनिंग
भारताच्या दोन माजी क्रिकेटपटूंनी राजकारणात प्रवेश केल्याचे बुधवारी पाहायला मिळालं. भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी (Manoj Tiwari) याच्यानंतर गोलंदाज अशोक डिंडा ( Ashok Dinda) यांनी राजकारणात प्रवेश केला. फलंदाज मनोज तिवारी यांना सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला, तर अशोक डिंडानं भाजपात प्रवेश केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांत निवडणूक?
पश्चिम बंगालसह चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशात एप्रिल महिन्याच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या प्रारंभी विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणूक कार्यक्रमावर अखेरचा हात फिरविण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक बुधवारी झाली. त्यात केंद्रीय गृहखाते व अन्य खात्यांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. पश्चिम बंगालमधील कायदा - सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत केंद्रीय निवडणूक आयोग समाधानी नाही. २०११ आणि २०१६ साली या राज्यात विधानसभा निवडणुका सहा टप्प्यांत पार पडल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या सुत्रांनी सांगितले की, पश्चिम बंगालमधील संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या ६,४००वर पोहोचली आहे. तर एकूण मतदान केंद्रांची संख्या ३० हजारांपेक्षा अधिक आहे.