ममता बॅनर्जींवरील हल्ल्यावर ओमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया; म्हणाले, "आशा करतो की निवडणूक आयोग..."
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 04:47 PM2021-03-11T16:47:26+5:302021-03-11T16:50:48+5:30
West Bengal Election : गुरूवारी निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जींच्या पायाला झाली दुखापत, जाणूनबुजून हल्ला केल्याचा ममता बॅनर्जींचा आरोप
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणूक प्रचारादरम्यान पायाला आणि मानेला दुखापत झाली होती. दरम्यान, आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. सध्या ममता बॅनर्जी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संपूर्ण घटनेचा निषेध केला आहे. तसंच कठिण निवडणूक मोहीम आणि संघर्ष असला तरी कोणीही हिंसाचारावर उतरू नये असं ते म्हणाले. तसंच निवडणूक आयोग या प्रकरणाच्या मूळापर्यंत जाईल अशी अपेक्षा करत असल्याचंही ते म्हणाले.
"निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो आणि माझे वडिलही माझ्यासोबत आहेत. या संघर्ष असलेल्या निवडणूक मोहिमांमध्ये कोणीही शारीरिक हिंसाचारावर उतरू नये. आम्हाला आशा आहे की निवडणूक आयोग मूळापर्यंत जाऊन या प्रकरणाची चौकशी करेल," असंही अब्दुल्ला म्हणाले.
My father joins me in condemning the assault on @MamataOfficial while campaigning. The rough & tumble of election campaigns should not descend in to physical violence & we hope the EC inquiry gets to the bottom of this.
— Omar Abdullah (@OmarAbdullah) March 11, 2021
ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला कसा झाला?
या निवडणुकीच्या रणधुमाळीत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरूवारी नंदीग्राम मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला. यानंतर ममता बॅनर्जी नंदीग्राम येथे एका मंदिरात पूजेसाठी गेल्या होत्या. मंदिरातून बाहेर परतल्यानंतर त्या गाडीत बसण्यासाठी जात होत्या. यावेळी त्या गाडीत शिरताना चार-पाच लोकांनी जोरात गाडीचा दरवाजा ढकलला. यावेळी, ममता बॅनर्जी यांना गंभीर दुखापत झाली, असा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांच्या डाव्या पायाला प्लास्टर करण्यात आले आहे.
पश्चिम बंगालची निवडणूक हायव्होल्टेज ठरणार
दरम्यान, देशात पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. परंतू सर्वात हायव्होल्टेज निवडणूक ही पश्चिम बंगालची ठरणार आहे. याठिकाणी भाजपाला काहीही करून पश्चिम बंगालची सत्ता मिळवायची आहे, तर तृणमूल काँग्रेसला काहीही करून सत्ता टिकवायची आहे. यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे.