West Bengal Exit Polls 2021: बंगालमध्ये चालणार भाजपाचा एक्का; माजी सहकारी देणार दिदींना धक्का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 09:23 PM2021-04-29T21:23:41+5:302021-04-29T21:44:11+5:30
West Bengal Exit Polls 2021 Mamata Banerjee And Suvendu Adhikari : नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी बाजी मारणार आणि ममता बँनर्जींना पराभवाचा धक्का बसणार का? याबाबत एक्झिट पोलमध्ये अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी नंदीग्राममधून विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. यावर गेल्या काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसला धक्का देत भाजपात प्रवेश केलेल्या शुभेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला नाही तर राजकारण सोडून देईन, असं म्हटलं होतं. यानंतर आता एक्झिट पोल (West Bengal Exit Polls 2021) जाहीर करण्यात आले आहेत. नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी बाजी मारणार आणि ममता बॅनर्जींना पराभवाचा धक्का बसणार का? याबाबत एक्झिट पोलमध्ये अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
इंडिया टीव्हीने दिलेल्या एक्झिट पोलनुसार, नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांचा पराभव निश्चित झाला आहे. तृणमूल काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या शुभेंदू अधिकारी यांचा विजय पक्का असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील 30 जागांमध्ये भाजपाला मोठी आघाडी आहे. शुभेंदू अधिकारी हे अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यावर नाराज होते. टीएमसीकडून त्यांना समजावण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले. मात्र त्यांनी अखेर टीएमसी सोडण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
टीएमसीमध्ये शुभेंदू अधिकारी यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. पश्चिम बंगालमधील 65 विधानसभा जागांवर अधिकारी कुटुंबाची मजबूत पकड आहे. या जागा राज्यातील सहा जिल्ह्यात पसरलेल्या आहेत. शुभेंदू अधिकारी यांच्या प्रभावाखाली असलेल्या जागांची संख्या राज्यातील एकूण 294 जागांपैकी पाचपेक्षा जास्त आहेत. शुभेंदू अधिकारी पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील प्रभावशाली राजकीय कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे 1982 मध्ये कांथी दक्षिणमधून काँग्रेसचे आमदार होते. मात्र, नंतर ते तृणमूल काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक झाले. शुभेंदू अधिकारी 2009 पासून कांथी मतदारसंघातून तीनदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
2007 मध्ये शुभेंदू अधिकारी यांनी पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राममध्ये इंडोनेशियन रसायन कंपनीविरूद्ध भूसंपादनाविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. सध्या देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष हे पश्चिम बंगालकडे लागलेले आहे. येथे दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे आव्हान उभे केल्याने ही निवडणूक चुरशीची बनली आहे. पश्चिम बंगालमध्ये आज आठव्या आणि अंतिम टप्प्यासाठी मतदान झाले. यानंतर आता 2 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र या आधी एबीपी न्यूज सी व्होटरने एक्झिट पोल (West Bengal Exit Polls 2021) जाहीर केला आहे. एक्झिट पोलमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) बंगाल राखणार की कमळ (BJP) फुलणार? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
पुन्हा ममता दीदी की मोदी?; पश्चिम बंगालमध्ये भाजपाची मुसंडी नक्की, पण...
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची हॅटट्रिक जवळपास निश्चित असून तृणमूल काँग्रेस (TMC) एकहाती सत्ता स्थापन करण्याची चिन्हं आहेत. एबीपी न्यूज सी वोटरने केलेल्या एक्झिट पोलनुसार ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये 152 ते 164 जागा मिळतील असा अंदाज आहे. एक्झिट पोलनुसार निकाल लागल्यास ममता बॅनर्जी सहजपणे सरकार स्थापन करू शकतात. कारण राज्यातील कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी 148 जागांची आवश्यकता आहे. एबीपी सी व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला बराच फायदा होताना दिसत आहे. भाजपाला 109 ते 121 जागा मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेस आणि डाव्यांच्या जागा 14 ते 25 दरम्यान असू शकतात.
रिपब्लिक भारत एक्झिट पोल
रिपब्लिक भारतच्या एक्झिट पोलमध्ये तृणमूल काँग्रेसला 128-138 जागा मिळतील असं म्हटलं आहे. तर भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या एक्झिट पोलनुसार भाजपाला 138 ते 148 जागा मिळू शकतात. तर डावे आणि काँग्रेसच्या आघाडीला 11-21 जागांवर समाधान मानावं लागेल. भाजपाने तृणमूल काँग्रेसला जोरदार टक्कर दिलेली पाहायला मिळत आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलने भाजपा 100 च्या वर जाईल असं म्हटलं आहे. तसेच काहींनी ते सत्तेच्या जवळ जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे.
West Bengal Exit Poll 2021 : ममता दीदी बंगाल राखणार की कमळ फुलणार?; जाणून घ्या एक्झिट पोल#WestBengalPolls#WestBengalElections2021#MamataBanerjee#TMC#NarendraModi#BJPhttps://t.co/jutooNb4dn
— Lokmat (@MiLOKMAT) April 29, 2021