पश्चिम बंगालमध्ये येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. परंतु त्यापूर्वी आता वातावरण तापू लागलं आहे. निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यात आरोपप्रत्यारोपांच्या फैरी रंगू लागल्या आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. अशातच तृणमूल काँग्रेसच्या एका खासदारानं भाजपा कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणू असल्याचं म्हणत जोरदार टीका केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि बशीरहाटवरून लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदार नुसरत जहाँ यांनी एक वादग्रस्त वक्तव्य करत भाजपा हा कोरोनापेक्षा अधिका घातक विषाणू असल्याचं म्हटलं. भाजपा ही हिंदू आणि मुस्लीम यांदा दंगा घडवून आणतं. जर भाजपा सत्तेत आली तर मुस्लिमांचे उलटे दिवस सुरू होतील, असंही त्या म्हणाल्या. नुसरत जहाँ या उत्तर २४ परगनाच्या मुस्लीम बहुल भागामध्ये प्रचारासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी भाजपाची तुलना कोरोना विषाणूशी केली. "तुम्ही सर्व डोळे उघडून ठेवा. भाजपासारखा धोकादायक विषाणू फिरत आहे. हा पक्ष धर्मांमध्ये भेदबाव आणि व्यक्ती व्यक्तींमध्ये भांडणं लावतो. जर भाजपा सत्तेत आली तर मुस्लिमांचे उलटे दिवस सुरू होतील," असं नुसरत जहाँ म्हणाल्या. अमित मालवीयंनी उपस्थित केला प्रश्ननुसरत जहाँ यांच्या वक्तव्यावर भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षावर मुस्लीम तुष्टीकरणाचा आरोप केला. "पश्चिम बंगालमध्ये लसीकरणावरून सर्वात वाईट राजकारण करण्यात येत आहे. सर्वप्रथम ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळातील मंत्री सिद्धीकुला चौधरी यांनी लसीची वाहतूक करणारा ट्रक थांबवला. आता दुसरीकडे तृणमूलच्या नेत्या प्रचारादरम्यान भाजपाची तुलना कोरोनाशी करत आहेत. परंतु ममता बॅनर्जी का शांत आहेत?," असा सवाल अमित मालवीय यांनी केला.
भाजपा कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणू; तृणमूलच्या खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
By जयदीप दाभोळकर | Published: January 15, 2021 2:48 PM
मार्च, एप्रिल महिन्यात पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता
ठळक मुद्देमार्च, एप्रिल महिन्यात पश्चिम बंगालमध्ये पार पडणार विधानसभेच्या निवडणुकातृणमूल काँग्रेस, भाजपाकडून आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरू