West Bengal Results 2021: "पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा विजय झाल्यास तो मोदी-शाह यांचा व्यक्तिगत पराभव मानायला हवा"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 08:11 AM2021-05-02T08:11:45+5:302021-05-02T08:13:14+5:30
औषधे, ऑक्सिजनअभावी रोज पाच हजारांवर चिता पेटत असताना राजकीय खेळ कोणाला सुचतात कसे?, राऊत यांचा सवाल
'महाराष्ट्रात सरकार पाडण्याचे सर्व प्रयत्न आतापर्यंत फसले आहेत. या पुढेही ते यशस्वी होतील असे मला दिसत नाही. प. बंगालात ममता बॅनर्जी जिंकल्या तर तो मोदी-शहा यांचा व्यक्तिगत पराभव मानायला हवा,' असं म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.
प. बंगालच्या निकालानंतर अमित शहा हे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीत लक्ष घालतील, असे जे सांगितले जाते ते कशाच्या आधारावर? एक तर पैशांचा व बळाचा वापर करून आमदार फोडाफोडी केली जाईल किंवा कोरोना स्थिती हाताळण्यात अपयश आल्याचे कारण देऊन राष्ट्रपती राजवट लावली जाईल. कोरोना स्थितीचेच कारण असेल तर केंद्रातल्या सरकारलाही सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही हे आधी प्रामाणिकपणे स्वीकारायला हवे. औषधे व ऑक्सिजनअभावी रोज पाच हजारांवर चिता पेटत असताना हे राजकीय खेळ कोणाला सुचतात कसे?, असा सवालही राऊत यांनी केला. त्यांनी आपल्या रोखठोक या सदरातून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली.
नवं संसद भवन उभारणं कोणत्या माणूसकीच्या व्याख्येत
कोरोनामुळे देश आर्थिक डबघाईला आला असताना १००० कोटी खर्चाचा नवा संसद भवन उभारणीचा प्रकल्प हाती घेणे व राबवणे हे कोणत्या माणुसकीच्या व्याख्येत बसते? यावर आवाज उठवेल तो पुन्हा राजद्रोही ठरतो. पाकिस्तान, बांगला देशसारखी राष्ट्रे हिंदुस्थानला मदतीचा हात पुढे करीत आहेत. इतकी देशाची परिस्थिती ढासळली आहे. प. बंगालच्या निकालानंतर या परिस्थितीत कशी सुधारणा होणार? कोरोना महामारीमुळे देशात प्रचंड पडझड झालीच आहे. ‘आत्मनिर्भर’ हिंदुस्थानास मदत करण्यासाठी रशिया, सिंगापूर, अमेरिका, फ्रान्सपासून पाकिस्तान, बांगला देशपर्यंतची कार्गो विमाने दिल्लीच्या विमानतळावर उतरत आहेत. प. बंगालचे निकाल काहीही लागले तरी देशाची ही परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आज केंद्र सरकारात उरले आहे काय?, असा सवालही त्यांनी केला.
... तरी सत्तावाद संपत नाही
दिल्लीसह देशाचे चित्र प्रथमच अस्थिर व बेभरवशाचे झाले आहे. कोरोना महामारीची स्थिती हाताळण्यास मोदींचे सरकार संपूर्ण अपयशी ठरले हे आता सर्वोच्च न्यायालयानेच मान्य केले. मोदी ज्या दिल्लीतून देशाचे राज्यशकट हाकत आहेत त्या दिल्लीतील स्मशानभूमीत प्रेतं जाळण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांना 24 तास रांगेत उभे राहावे लागते. पंडित राजन मिश्रंसारखा महान गायक वेळीच ऑक्सिजनचा बेड मिळाला नाही म्हणून स्वर्गवासी झाला. सामान्य माणसांचे हाल तर शब्दांत वर्णन करावे असे नाहीत. पानिपतावर सदाशिवभाऊ कोसळले व सैन्याची पळापळ झाली तसे चित्र दिसत आहे, असल्याचं राऊत यांनी नमूद केलं आहे.
परिस्थिती इतकी गंभीर होत चालली तरी सत्तावाद संपत नाही. आग्र्यामध्ये मृतदेह जाळण्यासाठी पाच दिवसांचे वेटिंग आहे. वाराणशीत मृतदेहांना खांदा द्यायला माणसे मिळत नाहीत. हे चित्र संपूर्ण देशाचेच आहे व त्याची जबाबदारी केंद्रातले मोदी सरकार घ्यायला तयार नसेल तर राजकारण्यांनी धोक्याची पातळी ओलांडली हे स्पष्ट होते. सध्याच्या संकटकाळातही सत्ताधाऱयांचे राजकारण थांबले नाही. जागोजागी चिता पेटत असताना प. बंगालातील भाषणबाजी, रोड शो शेवटपर्यंत संपले नाहीत. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ मात्र सोकावतो. प. बंगालचे निकाल अशारितीने काळ सोकावू देणार आहेत की बेबंद होऊ पाहणाऱया सत्तावादाला पायबंद घालणार आहेत? हा खरा सवाल आहे, असंही त्यांनी आपल्या सदरात नमूद केलं आहे.