नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा त्यांचा करिश्मा दाखवून दिला आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला २०० हून अधिक जागा मिळताना दिसत आहेत. तर भारतीय जनता पक्षाला ७५ च्या आसपास जागांवर यश मिळताना दिसत आहे. ममता बॅनर्जींचा पराभव करण्यासाठी, राज्यात सत्ताबदल घडवण्यासाठी भाजपनं जंगजंग पछाडलं. मात्र तरीही ममता बॅनर्जींनी हॅटट्रिक केली आहे. याच दरम्यान अनेक नेते ममता बॅनर्जींचं कौतुक करत आहेत. त्यांना शुभेच्छा देत आहेत. पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी देखील ममतांच्या दमदार कामगिरीचं भरभरून कौतुक केलं आहे. फूट पाडणाऱ्या आणि विभाजन करणाऱ्या पक्षांना पश्चिम बंगालमधील नागरिकांनी नाकारलं असं म्हटलं आहे.
ममता बॅनर्जींनी नंदीग्रामचा संग्राम जिंकला आहे. चुरशीच्या लढतीत दिदींनी माजी सहकाऱ्याला पराभूत केले आहे. पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. "ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे आज मिळालेल्या जबरदस्त विजयाबद्दल अभिनंदन. पश्चिम बंगालच्या लोकांनी फूट पाडणाऱ्या आणि विभाजन करणाऱ्या पक्षांना नाकारले. त्यासाठी येथील लोक कौतुकास पात्र आहेत" असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे. सध्या देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष हे पश्चिम बंगालकडे लागलेले आहे. येथे दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे आव्हान उभे केल्याने ही निवडणूक चुरशीची बनली आहे.
"पश्चिम बंगालच्या जनतेनं 'दीदी ओ दीदी'चं जबरदस्त उत्तर दिलंय"; अखिलेश यादवांचा मोदींना सणसणीत टोला
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) आणि भाजपाला (BJP) सणसणीत टोला लगावला आहे. पश्चिम बंगालच्या जनतेनं 'दीदी ओ दीदी'चं जबरदस्त उत्तर दिलंय असं म्हणत अखिलेश यांनी निशाणा साधला आहे. तसेच ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "पश्चिम बंगालमध्ये भाजपा द्वेषाचं राजकारण पराभूत करणारी जागरूक जनता, आक्रमकपणे लढा देण्याऱ्या ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा. भाजपाने एका महिलेवर खालच्या पातळीवर केलेल्या टीकेचं जनतेनं दिलेलं उत्तर आहे. 'दीदी ओ दीदी'ला चोख प्रत्युत्तर दिलं आहे" असं अखिलेश यांनी म्हटलं आहे.