नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Assembly Election 2021) सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. याच दरम्यान गेल्या काही दिवसांत तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपामध्ये गेले आहेत. अशातच ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. दक्षिण 24 परगनामधील सतगछिया येथून तृणमूल काँग्रेसच्या आमदार सोनाली गुहा (Sonali Guha)तिकीट न मिळाल्याने नाराज झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच त्या भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
"ममता दीदी मला सोडू शकतात तर मी का नाही? मी मुकुल रॉय यांच्याशी बोलले आहे की, मी निवडणूक लढणार नाही पण मला एक सन्माननीय पद हवं आहे. गुहा यांनी सांगितले की रॉय यांनी आपली मागणी मान्य आहे. मी नक्कीच भाजपमध्ये प्रवेश करेन" असं सोनाली गुहा यांनी म्हटलं आहे. सोनाली गुहा या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या सर्वात जवळच्या सहकारी होत्या. मात्र तृणमूल काँग्रेसकडून यंदा गुहा यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. तृणमूलकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर सोनाली गुहा यांना माध्यमांशी बोलताना रडू कोसळलं होतं.
"दीदी मला सोडू शकतात तर मी का नाही?, देव ममता बॅनर्जींनी सदबुद्धी देवो"
"देव ममता बॅनर्जींनी सदबुद्धी देवो. मी ममता बॅनर्जींना सुरुवातीपासून साथ दिली आहे. मला माझ्या भविष्याचा विचार करावा लागेल. मी एक राजकीय व्यक्ती म्हणून निष्क्रिय बसू शकत नाही" असं देखील सोनाली गुहा यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ममता दीदींच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या काही इच्छुक उमेदवारांची तिकिटं कापली गेली आहेत.
नेत्याला तिकीट नाकारल्याने TMC कार्यकर्ते संतापले; कार्यालयाबाहेर केली तोडफोड अन् जाळपोळ
तिकीट कापल्यामुळे अनेक जण नाराज झाले आहेत. दक्षिण 24 परगणामधील भानगर भागातले पक्षाचे नेते अराबुल इस्लाम यांना तिकीट नाकारण्यात आलं आहे. नेत्याल तिकीट नाकारल्याने कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. कार्यकर्त्यांनी चक्क पक्ष कार्यालयातील सामानाची जाळपोळ केली आहे. कार्यालयातील लाकडी खुर्च्याची तोडफोड करून त्या भररस्त्यात जाळल्याची घटना समोर आली आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपला निषेध व्यक्त केला आहे.
"गेल्या 10 वर्षांपासून मी ममता दीदींसोबत", बंगाली अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी यांचा TMCमध्ये प्रवेश
बंगाली अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी (Syantika Banerjee) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे. टीएमसीचे महासचिव पार्थ चॅटर्जी, मंत्री सुब्रत चॅटर्जी आणि ब्रात्य बसु यांच्या उपस्थितीत सायंतिका यांनी पक्षात प्रवेश केला आहे. सायंतिका बॅनर्जी यांनी टीएमसीमध्ये प्रवेश करताच भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बंगालला केवळ ममता दीदी हव्या आहेत. "मला ही संधी दिल्याबद्दल ममता बॅनर्जी यांचे मनापासून आभार. मी आज अधिकृतरित्या TMC मध्ये प्रवेश केला. मात्र खरं सांगायचं झालं तर गेल्या 10 वर्षांपासून मी ममता दीदींसोबत आहे. हीच वेळ आहे मतदारांकडे आपलं भविष्य उज्वल करण्याची. बंगालला फक्त बंगालची मुलगी हवी आहे. बंगालला केवळ ममता बॅनर्जी हव्या आहेत" असं सायंतिका बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.