कोलकाता – पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. भारतीय जनता पार्टीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसवर हिंसाचाराचे गंभीर आरोप लावले आहेत. बंगालमधील या घटनांचा निषेध करण्यासाठी भाजपाने संपूर्ण देशभरात धरणं आंदोलनही केले होते. बुधवारी भाजपाच्या बंगाल पदाधिकाऱ्यांकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे.
या व्हिडीओत असा दावा करण्यात आला आहे की, माणिक मोइत्रा नावाच्या एका व्यक्तीला सीतलकूची येथे मारण्यात आलं आहे. पण भाजपाने या व्हिडीओत ज्या व्यक्तीचा फोटो वापरला आहे तो एका प्रतिष्ठीत न्यूज चॅनेलचा पत्रकार अभ्रो बनर्जी यांचा आहे. बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर भाजपाने ९ लोकांच्या नावाची यादी जारी केली आहे. ज्यात मोमिक मोइत्रा, मिंटू बर्मन यांच्या नावाचा समावेश आहे. परंतु माणिक मोइत्रा नावाने कोणाची ओळख पटली नाही.
या व्हिडीओवरून वाद-विवाद झाल्यानंतर भाजपाने हा व्हिडीओ ट्विटरवरून हटवला आहे. मात्र त्याआधीच हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला होता. भाजपाने ५.२८ मिनिटांचा एक व्हिडीओ बुधवारी जारी केला. जो भाजपाच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आला होता. हा व्हिडीओ १२ हजाराहून अधिक लोकांनी पाहिला. व्हिडीओत जो फोटो लावला होता तो इंडिया टूडेचे पत्रकार अभ्रो बनर्जी यांचा होता
या प्रकरणात अभ्रो बनर्जी यांनी सांगितले की, आज सकाळी उठण्यासाठी मला थोडा वेळ झाला. तेव्हा मोबाईलवर पाहिलं की १०० पेक्षा अधिक मिस कॉल येऊन गेले. एवढे मिसकॉल पाहून मला धक्का बसला त्यानंतर अरविंद नावाच्या मित्राने फोन करून सांगितलं भाजपाच्या आयटी सेलने माणिक मोइत्राऐवजी तुझ्या फोटोचा वापर केला आहे. हा व्हिडीओ पाहून मी चकीत झालो असं त्यांनी म्हटलं. इतकचं नाही तर मी इथं १४०० किमी दूर आहे. परंतु एखादी चुकीची माहिती किती धोकादायक ठरू शकते. अभ्रो बनर्जी सध्या दिल्लीत आहेत आणि ते न्यूज चॅनेलमध्ये काम करतात.
पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना
पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर राज्यात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. रविवारी सुरू झालेला हिंसाचार अद्यापही शांत झाला नाही. बंगालच्या विविध भागात जाळपोळ, दगडफेक, तोडफोडीचे प्रकार सुरू आहेत. टीमसीच्या कार्यकर्त्यांकडून भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यात येत आहेत. त्यात अनेकांचा जीव गेलाय असा आरोप भाजपाने केला आहे.