"केंद्राचा अर्थसंकल्प न वाचता अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. पण, तो पूर्ण वाचला असता तर महाराष्ट्रासाठी किती भरीव तरतुदी आहेत, हे स्पष्ट झाले असते," असं म्हणत अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्यांवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिदेत केंद्रानं महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांसाठी ३ लाख ५ हजार कोटी रूपयांची भरघोस तरतूद केल्याचं त्यांनी नमूद केलं.
अर्थसंकल्पीय तरतूद, विविध विभागांनी विद्यमान प्रकल्पांबाबत यंदाच्या वर्षासाठी केलेली तरतूद, गुंतवणूक, केंद्राची हमी अशा विविध बाबी त्यांनी यातून मांडल्या. "हवामानाधारित शेती प्रकल्पासाठी ६७२ कोटी रूपये, महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस अँड रूरल ट्रान्सफॉर्मेशनसाठी २३२ कोटी रूपये, दमणगंगा-पिंजाळ लिंक प्रकल्पासाठी ३००८ कोटी रूपये, प्रत्येक घराला नळाचे पाणी या योजनेसाठी ११३३ कोटी रूपये, विदर्भ आणि मराठवाडा तसेच उर्वरित महाराष्ट्रातील दुष्काळप्रभावित जिल्ह्यांमध्ये सिंचनसुविधांसाठी ४०० कोटी रूपये देण्यात आले आहेत. तसंच शेतकरी सन्मान निधीसाठी ६८२३.८१ कोटी रूपये आहेत," अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.पायाभूत सुविधांबाबत काय?दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेच्या उर्वरित २६० कि.मीच्या कामांचा ३१ मार्च २०२१ पर्यंत कार्यारंभ होईल. ईस्ट-वेस्ट फ्रेट कॉरिडॉर, भुसावळ ते खरगपूर ते डंकुनीला मंजुरी देण्यात आली आहे. रस्ते प्रकल्पांसाठी एकूण १,३३,२५५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून यात एकूण ३२८ प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय मुंबई मेट्रो-३ साठी १८३२ कोटी रूपये, पुणे मेट्रोसाठी ३१९५ कोटी रूपये, नागपूर मेट्रो टप्पा-२ साठी ५९७६ कोटी रूपये, नाशिक मेट्रो प्रकल्पासाठी २०९२ कोटी रूपये, मुंबई मेट्रो प्रकल्पांसाठी ४४१ कोटी रूपये दिल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं.
विद्यमान ३९ रेल्वे प्रकल्प कार्यान्वयन अथवा नियोजन किंवा मंजुरीच्या विविध टप्प्यात आहेत. त्याची एकूण किंमत ८६,६९६ कोटी रूपये इतकी आहे. यात २०१७ कि.मीच्या १६ नवीन लाईन्स (४२.००३ कोटी रूपये), ११४६ कि.मीचे ५ गेज रूपांतरण प्रकल्प (११,०८० कोटी रूपये), ३५३९ कि.मीचे १८ डबलिंग प्रकल्प (३३,६१३ कोटी रूपये) यांचा समावेश आहे. रेल्वेने यंदाच्या अर्थसंकल्पात ७१०७ कोटी रूपये महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद असून ती ५०७ टक्के अधिक आहे. २००९ ते २०१४ या काळात महाराष्ट्राला प्रतिवर्षी ११७१ कोटी रूपये मिळत होते असंही त्यांनी नमूद केलं. यात अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ साठी ५२७ कोटी रूपये, वर्धा-नांदेड व्हाया यवतमाळ, पुसद मार्गासाठी ३४७ कोटी रूपये, इंदूर-मनमाड व्हाया मालेगाव मार्गासाठी ९५४७ कोटी रूपये, सोलापूर-उस्मानाबाद नवीन मार्ग व्हाया तुळजापूर साठी २०कोटी रूपये, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे गुंतवणूकीसाठी ७८९७ कोटी रूपये इतक्या प्रमुख तरतुदी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.टॅक्स डिव्होल्यूशनसाठी ४२,०४४ कोटी, वित्त आयोगाचे अनुदान १०,९६१ कोटी, स्पेशल असिस्टन्स फॉर कॅपिटल एक्सपेंडिचर ५२९ कोटी, सीएस/सीएसएसचे १३,४१६ कोटी रूपये याबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली. दरम्यान, राज्य सरकारनं प्रकल्पान खीळ न घालता ते वेगानं पूर्ण करण्याचं आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केलं.