Maharashtra Politics Mahayuti : विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यास महायुतीतून कोण मुख्यमंत्री होईल, अशी चर्चा सुरू आहे. याबद्दल महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांना प्रश्न विचारले जाताहेत. आता भाजपाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबद्दल भाष्य केले आहे. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय अमित शाह घेतील, असे विधान मुनंगटीवार यांनी केले आहे. (Bjp Leader Sudhir Mungantiwar said that Amit Shah will decide who will be the Chief Minister of the Mahayuti in Maharashtra)
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘लोकमत लोकनेता सन्मान २०२४’ या कॉफी टेबल बुकचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महायुतीच्या मुख्यमंत्री कोण असेल, याबद्दल विधान केले.
मुनगंटीवार म्हणाले, "अमित शाह सांगतील तो मुख्यमंत्री होईल"
या कार्यक्रमात बोलताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महायुतीच्या जागावाटपाबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले, "विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने जास्त जागांची मागणी केलेली नाही. आम्ही २८८ जागा महायुतीच्या म्हणून लढविणार आहोत. विधानसभेनंतर आणखी काही पक्ष आमच्याकडे येतील", असा दावा त्यांनी केला.
मुख्यमंत्रिपदाबद्दल बोलताना मुनगंटीवार म्हणाले, "एकनाथ शिंदे, अजित पवार की भाजपचा मुख्यमंत्री, हे महत्त्वाचे नाही. महायुतीचे नेते म्हणून तिन्ही पक्षांनी अमित शाह यांना मान्यता दिली आहे. आम्ही तिन्ही पक्ष स्वतंत्र असलो तरी गंगा, जमुना आणि सरस्वती यांच्या संगमाप्रमाणे आमचा महासंगम झाला आहे. निवडणुकीनंतर आमचे नेते अमित शाह सांगतील तो मुख्यमंत्री होईल", असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
बाळासाहेब थोरातांनी मुनगंटीवारांना काढला चिमटा
याच कार्यक्रमात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, "सुधीर मुनगंटीवार आमचे मित्र आहेत, ते अधून मधून जोरात बोलतात. भाजपामध्ये हल्ली मूळ भाजपचे कोण, हे शोधण्याची वेळ आली आहे. इतके इतर पक्षातील लोक त्यांच्याकडे गेले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळेल की नाही शंका आहे", असा चिमटा बाळासाहेब थोरातांनी मुनगंटीवारांना काढला.