डबरा : मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीत नेतेमंडळीकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. यातच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि डबरा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार इमरती देवी यांच्यावर आरोप करताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ यांची जीभ घसरली. इमरती देवी यांच्यावर टीका करताना कमलनाथ यांनी त्यांचे नाव न घेता त्यांना आयटम असे संबोधले. दरम्यान, यासंबंधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
कमलनाथ हे रविवारी डबरा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश राजे यांच्या प्रचार सभेत सहभागी झाले. यावेळी मतदारांना संबोधित करताना कमलनाथ यांनी भाजपा उमेदवार इमरती देवी यांच्यावर निशाणा साधला. "तुम्ही तर त्यांना माझ्यापेक्षा जास्त ओळखता. तुम्ही मला आधीच सावध करायला पाहिजे होते की, त्या काय आयटम आहेत?" असे कमलनाथ यांनी इमरती देवी यांचे नाव न घेता टीका केली. तसेच, कमलनाथ यांनी मतदारांचे कौतुक केले. यावेळी नेते विकले जाऊ शकतात, पण मतदार नाही. त्यामुळे तुम्ही ३ तारखेला सुरेश राजे यांना बहुमताने विजयी करा. मध्य प्रदेशाची ओळख मोठ-मोठ्या प्रदेशातून झाली पाहिजे. तरुणांचे भविष्य उज्ज्वल झाले पाहिजे, असे कमलनाथ म्हणाले.
दरम्यान, याच प्रचारसभेत अजय सिंह यांनी सुद्धा इमरती देवी यांना जलेबी देवी असे संबोधित केले. राज्यात कमलनाथ यांच्यासोबत अनेक ठिकाणी प्रचारसभा घेत आहे. मात्र आज डबरामध्ये जनसभा पाहिली. तशी इतर ठिकाणी दिसून आली नाही. त्यामुळे मला विश्वास आहे की, जनता येत्या ३ नोव्हेंवरला इमरती देवी यांनी जलेबी बनवतील, असे अजय सिंह म्हणाले.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर निशाणाकमलनाथ यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावरही निशाणा साधला. शिवराज सिंह चौहान एक चांगले कलाकार आहेत. ते अभिनेता शाहरूख खानला सुद्धा मात करतील. त्यांनी मुंबईत असले पाहिजे, असे कमलनाथ म्हणाले. याशिवाय, बेरोजगारी, भ्रष्टाचारमध्ये डुबलेल्या मध्य प्रदेशची जबाबदारी माझ्याकडे सोपविण्यात आली होती. मी मध्य प्रदेशला समृद्ध बनविण्यासाठी प्रयत्न करत असतानाच खरेदी करून सरकार पाडले, असे म्हणत कमलनाथ यांनी शिवराज सिंह चौहान यांच्यासह भाजपावर निशाणा साधला.