मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजल्यानंतर आता प्रत्येक राजकीय पक्षाने दंड थोपटले आहेत. कोरोना आणि लॉकडाऊन काळातील ही पहिलीच निवडणूक असल्याने सगळ्यांचे याकडे लक्ष आहे. यातच वंचित बहुजन आघाडीनेही बिहार निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. जे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये होऊ शकतं असं सांगत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमला साद दिली आहे.
याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशभरात नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात एमआयएमसोबत आम्ही लोकसभा निवडणुकीत लढलो, त्यात एक जागा एमआयएमला मिळाली, विधानसभा निवडणुकीत हे समीकरण चाललं असतं परंतु जागावाटपावरुन दोघांमध्ये तडजोड झाली नाही, एमआयएमने १०० जागा मागितल्या, त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला, आता बिहार निवडणुका आहेत, जे महाराष्ट्रात झाले नाही ते बिहारमध्ये होऊ शकते असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच बिहारमध्ये मुस्लीम, आंबेडकरवादी, आदिवासी मिळून ४० टक्के लोकसंख्या आहे. इतक्या मोठ्या जनाधाराने कोणत्याही सरकारला पाडू शकतो. हे सरकार नागरिकता आणि आरक्षणाच्या विरोधात आहे. मौलवी, मौलाना यासह जे शिक्षित मुसलमान आहेत त्यांनी याबाबत विचार करायला हवा. आपण सगळे एकत्र येऊन या निवडणुकीत सरकार पाडू शकतो. या बिहार निवडणुकीत एनडीएचा पराभव करणे हेच आमचं उद्दिष्ट आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
बिहारमध्ये दिवाळीपूर्वीच 'फटाके’ फुटणार
बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी विधानसभेच्या २४३ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी तारखांची घोषणा केली. त्यानुसार, बिहारमधील विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात होणार असून २८ ऑक्टोबर रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. तर, निवडणुकांचा निकाल १० नोव्हेंबर रोजी लागणार आहे. म्हणजेच दिवाळीपूर्वीच बिहारमध्ये फटाके फुटणार आहेत.
बिहार विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया २९ नोव्हेंबरपूर्वीच संपणार आहे. राज्यात २८ ऑक्टोबर रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार असून ३ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेण्यात येईल. निवडणुकांचा अंतिम टप्पा ७ नोव्हेंबर रोजी पडणार असून ३ दिवसांत म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यामुळे, दिवाळीपूर्वीच बिहारमध्ये कोणत्या पक्षाचे सरकार स्थापन होणार, हे स्पष्ट होणार आहे. दिवाळीपूर्वीच मतदार आणि उमेदवारांची दिवाळी साजरी होणार आहे. देशात १४ नोव्हेंबर रोजी दिवाळीला सुरूवात होत आहे.