बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींना काय सांगितलं? संजय राऊत यांनी गुपित उघड केलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 01:34 PM2021-08-21T13:34:13+5:302021-08-21T13:36:00+5:30
Uddhav Thackeray News: काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काल विरोधी पक्षाच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक आय़ोजित केली होती. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली होती.
मुंबई - काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काल विरोधी पक्षाच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक आय़ोजित केली होती. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली होती. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi ) यांच्यात काय चर्चा झाली याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाला होती. दरम्यान, या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली आणि त्यात उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांना काय सांगितलं याचं गुपित संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उघड केलं आहे. (What did Uddhav Thackeray tell Sonia Gandhi in the meeting? Sanjay Raut revealed the secret)
संजय राऊत म्हणाले की, काल सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात सर्व विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीत १९ पक्षांचे नेते उपस्थित होते. स्वतः मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाचा मुद्दा या बैठकीत उपस्थित केला. तो म्हणजे आज आपल्या समोर सत्ता नाही. पण आज आपण एकत्र आलोय. पण यानंतर जर सत्ता समिप दिसत असेल किंवा सत्तेची खुर्ची दिसत असेल, तेव्हा सुद्धा आपण सर्वानी एकत्र राहील पाहिजे.
दरम्यान, सध्या अफगाणिस्तानमधील सत्तासंघर्षामुळे चर्चेत आलेल्या तालिबानबाबतही संजय राऊत यांनी आपलं मत मांडलं. ते म्हणाले, तालिबान वाढत आहे हे सत्य आहे. तसेच तालिबानला पाकिस्तान आणि चीन चा पाठिंबा आहे हे देखील सर्वाना माहीत आहे. तेव्हा भारत सरकारने या शत्रू देशांना त्यांची जागा दाखवली पाहिजे, असे आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केले.
यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनाही राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, शिवसेना एक प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी पक्ष आहे. हे मोदींपासून फडणवीसांपर्यंत सर्वाना माहीत आहे. बाबरी मस्जिद पडल्यानंतर ज्यांनी हात वर केले होते त्यांनी शिवसेने बद्दल बोलू नये. जेव्हा मुंबईत १९९३ ला पाकिस्तानने दंगली उसळल्या तेव्हा देखील शिवसेनेने आपले हिंदुत्व दाखवले होते. त्यामुळे शिवसेनेनेला असले टोन्ट मारू नयेत, असा टोलाही त्यांनी लगावला.