Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी मारले एकाच दगडात ३ पक्षी; 'स्वबळ' शब्दामागे काय आहे नेमकी रणनीती?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 08:24 PM2021-06-19T20:24:59+5:302021-06-19T20:27:31+5:30
Shivsena Vardhapan Din: गेल्या काही दिवसांत भाजपा-शिवसेना एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे यावरून उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे संकेत दिले आहेत.
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात काँग्रेस स्वबळाचा नारा देत आगामी निवडणुकांत एकटं लढण्याची भूमिका घेत आहे. तर दुसरीकडे भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहेत. या मुद्द्यावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य करत भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाला एकप्रकारे इशारा दिला आहे.
स्वबळाच्या बाबतीत उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही कुणाची पालखी वाहणार नाही, स्वबळ हे महाराष्ट्राच्या हितासाठी हवं असा टोला त्यांनी लगावला आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हे सरकार आहे. शिवसेना स्वत:च्या अटी आणि शर्तीवर राजकारण करणार आहे. हा इशारा अप्रत्यक्षपणे भाजपालाही देण्यात आला आहे. शिवसेनाही स्वबळावर निवडणूक लढू शकते असं भाषणातून दिसून येत आहे. जे राजकारण करायचं असेल ते शिवसेनेच्या टर्मवर राजकारण करू. महाराष्ट्रात स्वबळावर कोणत्याही पक्षाला सत्ता आणता येत नाही. भाजपालाही आणि काँग्रेसलाही ते शक्य नाही. जे वास्तव आहे ते स्विकारा असा इशारा उद्धव ठाकरेंनी दोन्ही पक्षांना दिला आहे असं लोकमतचे वरिष्ठ संपादक संदीप प्रधान यांनी सांगितले.
त्याचसोबत गेल्या काही दिवसांत भाजपा-शिवसेना एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे. त्यावर जर सत्तेसाठी कोणी कासावीस झाले असतील तर शिवसेना त्यांच्यामागे फरफटत जाणार नाही हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील राजकारणात कोणीही कोणासोबत जाऊ शकतं. भाजपा राष्ट्रवादीसोबत जाऊ शकतं. शिवसेना-राष्ट्रवादीसोबत जाऊ शकतं. शिवसेनेने पुढे काय करायचं हे मी ठरवणार आहे. मी कुणाची पालखी वाहणार नाही हे वाक्य त्यांनी एकप्रकारे राष्ट्रवादी आणि भाजपाला उद्देशून म्हटलं, कोणीही मला गृहित धरू नये हेच त्यांना सांगायचं आहे असंही संदीप प्रधान म्हणाले.
एकहाती सत्ता आणू म्हटल्यावर लोकं जोड्याने हाणतील, नाव न घेता उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला इशारा @OfficeofUT@ShivSena#Congresshttps://t.co/Dqmbhhl53R
— Lokmat (@MiLOKMAT) June 19, 2021
आगामी महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा देऊन जास्त जागा पदरात पाडण्याचं काँग्रेसचं राजकारण असेल मात्र एका विशिष्ट मर्यादेपर्यंत शिवसेना तडजोड करायला तयार आहे. पण जास्त मागणी झाल्यास शिवसेना कोणाची पालखी वाहणार नाही असं अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. महाविकास आघाडीबाबत जपतानाच आजच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी राम मंदिरावर कुठेही भाष्य केलेले नाही. त्याचसोबत भाजपाच्या केंद्रीय पातळीवरील नेत्यांबाबतही थेट टार्गेट करणं टाळलं आहे. राम मंदिराच्या जमीन खरेदीत जे आरोप होत आहेत. त्यावर काही बोलले नाही. कारण त्यावर बोलणं म्हणजे संघाची नाराजी ओढावून घेणे हे त्यांनी केले नाही. भविष्यात शिवसेनेला पर्याय हवा असेल तर राष्ट्रीय नेतृत्वाची नाराजी उद्धव ठाकरेंना घ्यायची नाही. भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वावर भाष्य टाळलं आहे. लसीकरण धोरणांवर काही बोलले नाही. आजच्या भाषणात हा समतोल राखून त्यांनी एक वेगळ्याप्रकारचे संकेत दिले असावेत असंही संदीप प्रधान यांनी सांगितले.
पाहा व्हिडीओ