- संदीप प्रधान
‘बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ’. या तो यूँ कह दो के ‘नाम तो बदनाम में भी है’. या ‘बदनाम में भी नाम है लेकिन नाम तो दोनों मे है’. या पंक्तींची आठवण होण्याचे कारण गेल्या काही दिवसांतील काही नेत्यांची सोशल मीडिया, मीडियावरील वक्तव्ये. शिवसेनेचे खा. संजय राऊत यांचे ‘आपण डॉक्टरांकडून नव्हे, तर कंम्पाऊंडरकडून औषध घेतो’ हे किंवा ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) ही इकडून तिकडून आणलेल्यांची संघटना आहे. त्यामध्ये कुणीच डॉक्टर नसून राजकारणी अधिक आहेत’ ही वक्तव्ये सध्या फेसबुके, व्हॉटसअपे, ट्विटरवरील टिवटिवे यांना भरपूर खाद्य पुरवत आहेत.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांबाबत अविश्वास व्यक्त करणारे ट्विट असेच चर्चिले गेले. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या या मंडळींना अलीकडे वरचेवर ट्रोल केले जाते. परंतु पुन:पुन्हा ही मंडळी तेच करताना दिसतात. याचे कारण राजकारण, बॉलिवुड, बिझनेस वगैरे क्षेत्रातील काही मंडळींना सोशल मीडियावरील सकारात्मक (किंबहुना अधिक नकारात्मक) प्रसिद्धीची नशा आकर्षित करीत आहे.
एका वाहिनीवरील कार्यक्रमात राऊत यांनी ही बेलगाम वक्तव्ये केली. राऊत हे शिवसेनेचे राज्यसभा सदस्य आहेत. संसद सदस्यांचे अभ्यास दौरे, संसदीय समित्या यांच्या कामकाजाच्या निमित्ताने ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींना गेल्या काही वर्षांत नक्की भेटले असणार. त्यामुळे डब्ल्यूएचओ किंवा युनेस्को वगैरे संघटनांवरील नियुक्त्या कशा व किती विचारपूर्वक केल्या जातात हे त्यांना नक्की ठाऊक असेल. भांडुपमधील शिवसेनेचे तालुकाप्रमुख नियुक्त करण्याइतके या संघटनांवर नियुक्त्या होणे सोपे खचितच नसेल. याच डब्ल्यूएचओने धारावीतील कोरोना रोखण्यातील राज्य सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओबद्दल बोलताना त्यांनी भान राखायला हवे होते. तीच गोष्ट डॉक्टरांबाबत वक्तव्य करताना. सध्या देशात वैद्यकीय क्षेत्राचे दोन चेहरे लोकांना दिसत आहेत. सरकारी, महापालिका इस्पितळातील डॉक्टर अथक परिश्रम करून कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्याचवेळी काही मोजकेच पण खासगी डॉक्टर कोरोना रुग्णांकडून अव्वाच्यासव्वा बिले उकळत आहेत. या दोन्ही बाजू खऱ्या असल्या तरी सत्ताधारी पक्षाचे नेते या नात्याने राऊत यांनी डॉक्टरांना दुखवायला नको होते. जे एखाद्या शेंबड्या पोराला कळेल ते दीर्घकाळ राज्यसभा सदस्य राहिलेल्या, कार्यकारी संपादकपदाची खुर्ची वर्षानुवर्षे भूषवलेल्या व्यक्तीला कळत नाही का? याचे उत्तर निश्चितच कळते. पण प्रसिद्धीची नशा भल्याभल्यांना वेडाचार करायला भाग पाडते.
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याकरिता राऊत यांनी प्रयत्न केले. शरद पवार हे या सरकारचे आधारस्तंभ असतील तर राऊत हे भरभक्कम स्तंभ आहेत. सरकार बनले तरी राऊत यांचे बंधू सुनील यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. ते शल्य त्यांच्या मनात आहे व यापूर्वी कृतीतून राऊत यांनी ते दाखवून दिले आहे. मात्र हे सरकार बनवण्यात, टिकवण्यात आपला असलेला वाटा व त्यामुळे मीडियाच्या गळ्यातील आपण ताईत बनलो आहोत, ही भावना राऊत यांना कॅमेरा व बूम समोर आल्यावर स्वस्थ बसू देत नाही. त्यांना विचारल्या गेलेल्या किंवा न गेलेल्या प्रश्नांवर ते मागचापुढचा विचार न करता बोलून मोकळे होतात. त्यामुळे वाद निर्माण होतो व त्यामुळे राऊत चर्चेत येतात. ट्रोल होतात. विरोधक त्यांच्यावर तुटून पडतात. पर्यायाने सत्ता आणूनही राऊत दुर्लक्षित राहिले तरी त्यांच्या भोवतीचे प्रसिद्धीचे वलय तसूभरही कमी होत नाही. हे वलय टिकवण्याचीच नशा त्यांना जडली आहे.
पार्थ पवार हेही राऊत यांच्यासारखेच प्रसिद्धीच्या वलयात आहेत. पार्थ लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. मात्र सुशांतसिंग प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करून किंवा राम मंदिराच्या भूमिपुजनाच्या तोंडावर ‘जय श्रीराम’चा नारा देऊन त्यांनी वाद आणि पाठोपाठ प्रसिद्धी ओढवून घेतली. पार्थ यांना पक्षाने कुठलीही जबाबदारी दिलेली नाही. उपेक्षेमुळे तेही अस्वस्थ असू शकतील. मात्र पक्षात जरी आपल्यावर अन्याय होत असला तरी सोशल मीडिया, मीडिया यामध्ये चर्चेत कसे राहायचे हे त्यांनी उत्तम साधले आहे.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हेही सोशल मीडियावर प्रसिद्धीबाबत जागरुक आहेत. भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर थेट आरोप केलेले नसतानाही ‘माझ्या संशयाची परीक्षा पाहू नका’, असे पत्रक प्रसिद्ध करुन त्यांनी सुशांतसिंग राजपूत आत्महत्येवरून सोशल मीडियावर जो बऱ्यावाईट चर्चेचा पूर आला आहे त्यात हातपाय मारले आहेत. यापूर्वी आदित्य हेही अनेकदा त्यांच्या ट्विटमुळे ट्रोल केले गेले आहेत. मात्र तरीही ते उत्साहाने ट्विट करतात. किंबहुना सोशल मीडियावरील ट्रेन्ड पाहून ते अनेकदा मंत्री या नात्याने निर्णय घेतात.
आदित्य ठाकरे, पार्थ पवार, रोहित पवार हे तरुण पिढीचे सदस्य असो की, संजय राऊत, राम कदम, अमृता फडणवीस किंवा मनसेचे अविनाश जाधव हे सर्वच नेते हल्ली ट्विट करून, मीडियाला बिनधास्त बाईट देऊन मोकळे होतात. काही स्वत: ट्विट करतात तर काहींनी याकरिता चमू नियुक्त केला आहे. काही नेत्यांनी जाहिरात एजन्सी अथवा इमेज बिल्डींग एजन्सी नेमल्या आहेत. सदसद्विवेकबुद्धीपेक्षा चर्चेत राहणे, ट्विटर-फेसबुकवरील फॉलोअर्स कित्येक पटीत वाढवणे, ट्रोल झालो तरी ट्रेंडिंग न्यूजमध्ये असणे याला हे सारेच नेते सध्या महत्त्व देत आहेत. वादापासून चार हात दूर राहणे हा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांकडून केला जाणारा विचार आता बाद ठरला असून ‘बदनाम हुए तो क्या, नाम तो हुआ...’ हा नवा ट्रेन्ड अलंकारासारखा मिरवला जात आहे.