बारामती : बारामतीमध्ये मी आलोय ती उखडायला आलोय असं ते म्हणाले. आता हा माझी काय उखडणार कुणाला माहिती. काय उखडायची ती उखडा. उगीचच उंटाचा कुठलाही मुका घ्यायला जाऊ नका, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांना खडसावले.बारामती आणि इंदापूर येथे शरद पवार यांची रविवारी सभा झाली. बारामती येथे पवार म्हणाले, मला पद्मविभूषण देणारे, माझं बोट धरून शिकलोय असं म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार यांनी काय केले म्हणून विचारतात हे हस्यास्पद आहे. हे सरकार सैन्य कारवाईचे श्रेय स्वत:ला घेत आहे. अभिनंदनची सुटका माझ्यामुळे झाली असं सांगत पंतप्रधान मोदी ५६ इंचाची छाती दाखवतात. मग आपला कुलभूषण जाधव कित्येक वर्ष पाकिस्तानात आहे. त्याला सोडवताना मात्र याच पंतप्रधानांची छाती एकदम १२ इंचाची कशी काय होते?भीमा-पाटस कारखान्याच्या कामगारांचे शिष्टमंडळ मला भेटले. २२ महिने पगार नाही. सभासदांना ऊसाचे पैसे नाहीत. शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे बुडवणारे मोहिते पाटील, रणजित निंबाळकर व राहुल कुल हे मोदी यांच्या मंचावर उभे असतात. या सरकारच्या काळात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. केंद्रातील सत्ताधारी मंडळी नेहमी मला विचारतात तुम्ही खाणाºयापेक्षा पिकवणाºयाचा जास्त विचार करता, मी त्यांना म्हणतो पिकवणारा जगला तरच खाणारा जगेल.
मुख्यमंत्र्यांनी दादाची शिकवणी लावलीबारामतीत येऊन अमित शहा यांना विकास दिसत नसेल तर त्यांच्या डोळ्याचे आॅपरेशन करावे लागेल, असा टोला लगावत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, बेटी बचाव ही मोहीम शरद पवारांची नसून माझी आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा अभ्यास नेहमीप्रमाणे कमीच पडतो. त्यांनी अजित पवारांची शिकवणी लावली पाहिजे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी माझ्या कामाचं कौतुक केले म्हणून त्यांचे लोकसभेचे तिकीट कापले.तू कसा आमदार होतो तेच बघतो - अजित पवारजलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर टीका करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत हा कसा आमदार होतो तेच मी बघतो. अजित पवारने एकदा ठरवलं तर कुणाच्या बापाचं ऐकत नाही हे सगळ््यांना माहिती आहे, अशा शब्दात त्यांनी विजय शिवतारे यांना आव्हान दिले.