काय आहे पंतप्रधान मोदी यांनी आरोप केलेला पवार कुटुंबातील ‘गृहकलह‘!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 10:15 PM2019-04-01T22:15:52+5:302019-04-01T22:18:21+5:30
पवार कुटुंबामध्ये गृहकलहाचा आरोप केला जात असला तरी ही राजकीय वारशाची लढाई असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
-अविनाश थोरात
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील सभेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरातील गृहकलहाचा उल्लेख केल्याने याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. या भाषणानंतर राजकारणातील ‘पवार फॅक्टर’पुन्हा चर्चेत आला आहे.
कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार शरद पवार यांचे एकंदर स्थान पाहता त्यांच्या कुटुंबात कोणी त्यांच्या निर्णयाच्या विरोधात जाऊ शकत नाही. त्यामुळे पवार कुटुंबियांची बदनामी करण्यासाठी या प्रकारचे आरोप केले जात आहेत. पंतप्रधानांनी या बाजारगप्पांना निवडणुकीत वापरणे अत्यंत गैर आहे. या प्रकारची वैयक्तिक टीका करून मोदी स्वत:चाच मान कमी करून घेत आहेत. या प्रकारची खालच्य दर्जाची टीका केल्याबद्दल मोदी यांचा निषेध करण्याची तयारीही कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे.
मात्र, मोदी यांच्या टीकेनंतर गेल्या काही महिन्यांतील अनेक घडामोडींवरही चर्चा सुरू आहे. बारामती येथे बोलताना शरद पवार यांनी ठेच लागली की शहाणपण येते असे वक्तव्य केले होते. अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या पहिल्याच अडखळत्या भाषणाबाबत हे वक्तव्य होते, असे आता म्हटले जाऊ लागले आहे. शरद पवार यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोलताना पार्थ पवार मावळमधून लढणार नाही, असे सागिंतल्याची आठवणही अनेक जण करून देत आहेत. मात्र, तरीही पार्थ यांनी अर्ज भरलाच. त्यामुळे शरद पवार यांना माढा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घ्यावा लागला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याकडून या सगळ्या घडामोडीच्या मागे एक ‘कथित’ बैठकीचा संदर्भ दिला जात आहे. या बैठकीत पवार कुटुंबात पार्थ यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली. या वेळी पार्थ यांच्या आई सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढविण्याबाबत आग्रही भूमिका घेतली होती.
राजकीय वारसाची लढाई
पवार कुटुंबामध्ये गृहकलहाचा आरोप केला जात असला तरी ही राजकीय वारशाची लढाई असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. आपल्या दोन पुतण्यांपैकी अजित यांना राजकारणात तर राजेंद्र यांना शिक्षण आणि समाजकारणाची जबाबदारी शरद पवार यांनी दिली होती.त्यामुळे राजेंद्र पवार हे राजकारणापासून अलिप्त राहिले. मात्र, त्यांचे पुत्र रोहित पवार यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून प्रथम राजकारणात पदार्पण केले. या पार्श्वभूमीवर पार्थ यांना तातडीने राजकारणात आणि ते देखील थेट लोकसभेच्या माध्यमातून आणण्यात आले. हाच संदर्भ मोदी यांनी घेतल्याचे म्हटले जात आहे.
या गृहकलहाची होती आजपर्यंत चर्चा
* शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी राज्यसभेतील खासदारकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केल्यावर अजित पवार- सुप्रिया सुळे यांच्या वादाची चर्चा झाली होती. शरद पवार यांचे राजकीय वारस अजित पवार आहेत असे सगळ्यांना वाटत असताना सुप्रिया यांचे राजकारणात आगमन झाले. महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांना आणायचे चालले आहे, असेही बोलले जाऊ लागले.
* महाराष्ट्रातील २००४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसला कॉँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. ज्या पक्षाला जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असे आघाडीचे सूत्र होते. मात्र, त्यावेळी केंद्रात मंत्री असलेल्या शरद पवार यांनी कॉँग्रेसलाच मुख्यमंत्रीपद देऊ केले. अजित पवार यांची मुख्यमंत्रीपदाची संधी गेली. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत जाऊन अजित पवार वेगळे समीकरण करणार अशी चर्चा त्या वेळी झाली होती.
* पुणे जिल्हा आणि राज्याच्या राजकारणातही राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये अजित पवार यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची वेगळी ओळख आहे. त्यांच्यासाठी अजित पवार निवडणुकीच्या काळात ताकद वापरतात. त्यांना पदे मिळतात, असे बोलले जाते. दौंड विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये शरद पवार यांना मनातून राहूल कुल यांना उमेदवारी द्यायची होती. मात्र, अजित पवार यांनी रमेश थोरात यांच्यासाठी ताकद लावली. त्यांनाच उमेदवारी मिळाल्याने पवारांशी निष्ठावान मानले जाणारे कुल कुटुंबिय त्यांच्यापासून दूर गेले. राहूल कुल यांच्या पत्नी कांचन कुल आता बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लढत आहेत.
* शरद पवार यांच्या तिसऱ्या पिढीने राजकारणात प्रवेश केला आहे. यामध्येही राजेंद्र पवार यांचे पुत्र रोहित आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्यातील राजकीय स्पर्धेची चर्चा नेहमी होते. रोहित यांनी उद्योजकतेच्या माध्यमातून आपले स्थान निर्माण केले होते. तरीही त्यांनी बारामती तालुक्यातून जिल्हा परिषद निवडणूक लढवून जिंकली. नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून ते आमदारकीची निवडणूक लढविणार असल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांच्या लोकसभा उमेदवारीसाठी अजित पवार आणि सुनेत्रा पवार आग्रही असल्याचे बोलले जाते.