मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीनं कारवाई करत त्यांची ४ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर १०० कोटींच्या वसुलीसाठी दबाव आणला होता असा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणाची ईडी चौकशी सुरु झाली. आता राष्ट्रवादीचे दुसरे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपाने गंभीर आरोप केला आहे.
भाजपाचे नेते किरीट सोमैय्या यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात म्हणाले की, ठाकरे सरकारचे १२ आमदार चौकशीच्या फेऱ्यात आहेत. एखाद्याच्या मागे ईडी लागली की त्याचा काळ बदलतो असा मेसेज सोशल मीडियात काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. ईडी आणि कॅग अधिकाऱ्यांनी एका आमदाराची २ तास चौकशी केली होती. ईडीनं जप्त केलेले SRA फ्लॅट विकसित करण्यासाठी दिले आहेत. त्यानंतर जितेंद्र आव्हाड प्रवीण कलमे जोडी पुढे आली. कलमे यांच्यासोबत काय संबंध आहे याचा खुलासा जितेंद्र आव्हाडांनी करावा असं त्यांनी मागणी केली आहे.
काय म्हणाले किरीट सोमैय्या?
ठाकरे सरकारमध्ये किती जोड्या आहेत हे आता समोर येत आहे. जितेंद्र आव्हाड आणि प्रवीण कलमे ही जोडी समोर आली आहे. प्रवीण कलमे याच्यासोबत जितेंद्र आव्हाडांचे संबंध काय? महाराष्ट्रात १०० टक्के लॉकडाऊन होतं. मुख्यमंत्री घरात होते तेव्हा जितेंद्र आव्हाडांचा एजेंट SRA अधिकाऱ्यांविरोधात तक्रार देतात. जितेंद्र आव्हाड या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश देतात. प्रवीण कलमे हा जितेंद्र आव्हाडांचा माणूस आहे. कोविड काळात जितेंद्र आव्हाड वसुलीच्या कामात लागले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जितेंद्र आव्हाडांकडून खुलासा मागवावा अन्यथा त्यांची मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी सोमैय्यांनी केली.
ठाकरे सरकारमध्ये आणखी किती जोड्या आहेत मुख्यमंत्र्यांनी सांगावे, म्हाडामध्ये कुठे काय चालू आहे याबाबत माहिती काढण्याचं काम सुरू आहे. १०० टक्के लॉकडाऊन असताना जितेंद्र आव्हाडांना पैसे कमवायचं सुचत होतं. SRA मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. अनिल देशमुख यांचा सचिन वाझे तसा जितेंद्र आव्हाडांचा प्रवीण कलमे आहे. ईडीने SRA चा तपास सुरू केला आहे. SRA च्या अधिकाऱ्यांना बोलावून चौकशी सुरू केली आहे. ठाकरे सरकारमध्ये किती वसुली एजेंट आहेत त्याचा शोध घेतला जाईल असं किरीट सोमैय्या म्हणाले.
काय आहेत आरोप?
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आशीर्वादाने एसआरए, म्हाडा, महापालिकेमध्ये १०० बिल्डरची यादी, १०० आरटीआय, मंत्री महोदयांचे आदेश घेऊन प्रविण कलमे नावाचा व्यक्ती हा आव्हाडांचा राईट हँड गेले काही महिने वसुली गँग चालवत आहे" "गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे वाझे म्हणजे प्रविण कलमे हे महापालिका, म्हाडा, एसआरए मध्ये १०० बिल्डर्सच्या विरोधात १०० आरटीआय करतात. त्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड त्वरित अहवाल सादर करावा असे आदेश देतात. लगेच एसआरए असो, म्हाडा असो यांचे ‘वसुली गँग’चे अधिकारी कामाला लागतात असा आरोप किरीट सोमैय्यांनी केला आहे.