नवी दिल्ली: बीएस येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. आज दुपारी त्यांनी राज्यपाल थावरचंद गहलोत यांना आपला राजीनामा सोपवला. यानंतर आता येडियुरप्पा काय करणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत त्यांनी स्वतः खुलासा केला आहे. यापुढे फक्त राज्याच्या कल्याणासाठी काम करणार, असे ते म्हणाले.
78 वर्षीय येडियुरप्पा म्हणाले की, राज्य सोडून इतर कुठे जाणार नाही. कर्नाटकमध्येच राहून राज्याच्या कल्याणासाठी काम करणार. यावेळी त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर नाराज असल्याच्या आणि दबावाखाली येऊन राजीनामा दिल्याच्या वृत्तांचे खंडन केले. ते म्हणाले की, कुणीच माझ्यावर राजीनाम्यासाठी दबाव टाकला नाही. राजीनाम्याचा निर्णय माझा स्वतःचा होता. मी पुढच्या निवडणुकीत भाजपला सत्तेत आणण्यासाठी काम करेल. तसेच, पक्ष नेतृत्वाने दिलेले जबाबदारी योग्यरित्या हाताळेल, असेही ते म्हणाले.
'सायकलवर फिरून कर्नाटकात भाजप उभी केली'राजीनामा दिल्यानंतर विधानसभेत बोलताना येडियुरप्पा हे भावूक झाले. तसंच या दोन वर्षांच्या कार्यकाळात आपली सातत्यानं परीक्षा झाली असल्याचं म्हटलं. "ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, तेव्हा मला त्यांनी केंद्रात मंत्री बनण्यास सांगितलं होतं. परंतु मी त्यांना नकार दिला आणि कर्नाटकातच राहणार असल्याचं म्हटलं होतं," असं येडियुरप्पा म्हणाले. "मी आपल्या राजकीय जीवनात कायमच अग्निपरीक्षा दिली आहे. जेव्हा कार नव्हत्या तेव्हा मला आठवतंय की मी दिवसभर सायकल चालवून पक्षासाठी काम करत होते. शिमोगाच्या शिकारीपुरामध्ये ठराविकच कार्यकर्त्यांसोबत मी भाजप पक्ष उभा केला. तेव्हा कोणीही नव्हतं. पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन व्हावं अशी माझी इच्छा होती, ती पूर्ण झाली," असंही त्यांनी नमूद केलं.