- मनोज मुळ्येनारायण राणे आणि त्यांचा स्वाभिमान पक्ष या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात काय भूमिका बजावणार, याचीच सर्वांना उत्सुकता आहे. शिवसेना-भाजपाची युती झाल्यामुळे विनायक राऊत, स्वाभिमानचे उमेदवार नीलेश राणे आणि काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर अशी तिरंगी लढत अपेक्षित आहे. स्वाभिमान पक्ष प्रथमच लोकसभा निवडणीकीच्या रिंगणात उतरत असल्याने चुरस व औत्स्युक्य वाढले आहे. भाजपाच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सद्य:स्थितीत खासदार राऊत यांचा प्रचार न करण्याची भूमिका घेतली आहे; पण मतदारसंघात पाच आमदार व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मोठा वाटा हाती असलेल्या शिवसेनेचे पारडे जड आहे, हेही तितकेच खरे.गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीकडून विनायक राऊत आणि काँग्रेसकडून तत्कालीन खासदार नीलेश राणे यांच्यामध्ये लढत झाली. त्यात विनायक राऊत यांनी तब्बल १ लाख ५0 हजार ५१ मतांनी नीलेश राणे यांचा पराभव केला होता. त्यावेळी असलेली मोदी लाट आणि त्याहीपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच असलेली राणेविरोधी लाट यामुळे नीलेश यांचा पराभव झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी राणे यांच्याविरोधात एकवटले होते. त्यामुळे २00९च्या निवडणुकीत सिंधुदुर्गातून भक्कम आघाडी घेणाऱ्या नीलेश राणे यांना २0१४च्या लोकसभा निवडणुकीत मात्र रत्नागिरीबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांमध्येही आघाडी मिळाली नाही.गेल्या पाच वर्षांत विनायक राऊत यांनी मतदारसंघाशी आपला संपर्क कायम ठेवला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेने आपला झेंडा कायम ठेवला आहे. मात्र या प्रवासात त्यांनी भाजपाला सोबत न घेतल्याने भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांत नाराजी आहे. विनायक राऊत यांनी विकास कामांमध्ये न दिलेली साथ आणि सातत्याने भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांवर केलेली टीका यांमुळे त्यांचा यंदा निवडणुकीत प्रचार न करण्याचे भाजपा कार्यकर्त्यांनी सध्या तरी ठरविले आहे. अर्थात हे वादळ फार काळ टिकणारे नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे काँग्रेसचे होते, ते आता स्वाभिमान पक्षाचे झाले आहे. नीलेश राणे यांच्यासोबत पक्ष म्हणून असलेली काँग्रेसची मते कमी झाली आहेत. त्यामुळे स्वाभिमानकडून लढताना नीलेश राणे यांना कडवी लढत द्यावी लागेल, हे नक्की आहे.आजच्या घडीला नीलेश राणे यांची उमेदवारी हाच चर्चेचा विषय आहे. सेना-भाजपाची युती झाल्याने युतीकडून राऊत हेच निवडणूक लढणार, हे स्पष्ट आहे. आता नीलेश राणे यांच्या स्वाभिमान पक्षाला स्वतंत्र लढावे लागेल. त्यामुळे रंगत वाढणार आहे, हे निश्चित आहे. स्वाभिमान पक्ष वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी गेल्या काही काळात केला आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात सक्षम असलेला स्वाभिमान पक्ष अजून रत्नागिरी जिल्ह्यात स्थिर झालेला नाही. रत्नागिरी जिल्ह्यात अन्य कोणत्याही पक्षापेक्षा शिवसेनेची पाळेमुळे अधिक घट्ट आहेत, हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जागांवरून लक्षात येते.काँग्रेसकडून गेल्या आठवड्यातच उमेदवार म्हणून नवीनचंद्र बांदिवडेकर यांचे नाव पुढे आले आहे. काँग्रेसची पारंपरिक मते अजूनही ठाम असली तरी तळागाळात प्रचारासाठी लागणारे कार्यकर्ते काँग्रेसकडे नाहीत. त्यात बांदिवडेकर अगदीच निवडणुकीच्या तोंडावर लोकांसमोर आले आहेत. त्यामुळे त्यांनाही कडवी लढत द्यावी लागणार आहे.>सध्याची परिस्थितीगेल्या पाच वर्षांत झालेला मोठा बदल म्हणजे नारायण राणे यांनी काँग्रेस सोडून केलेली स्वाभिमान पक्षाची स्थापना. यावेळी नीलेश राणे स्वाभिमानकडून रिंगणात असू शकतील.शिवसेना-भाजपा युती झाली असली तरी गेल्या साडेचार वर्षांत दोन्ही पक्षांतून विस्तव न गेल्याने भाजपा कार्यकर्ते राऊतांचा प्रचार करतील का, याबाबत साशंकता आहे.या लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर, असे तीनही आमदार शिवसेनेचे आहेत, तर सिंधुदुर्गातील तीन मतदारसंघांत दोन शिवसेनेचे आणि एक काँग्रेसचा आमदार आहे.
राणे यांचा ‘स्वाभिमान’ काय करणार?, तिरंगी लढतीची अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 6:15 AM