मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणी मुंबई पोलिसांविरोधात टीका करणाऱ्याना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात झोडपले असताना शिवसेनेचे नेते पोलीस आणि अवैध धंद्यांबाबत वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. गुहागरचे शिवसेना नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी बेकायदा दारु विकणाऱ्या शिवसैनिकाला भरसभेत पाठीशी घालत पोलिसांवर हप्तेखोरीचा आरोप लावला आहे.
शिवसेनेच्या उप तालुका प्रमुखाने पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झाले? पोलीस हप्ते घेत नाहीत का? असा सवाल केला आहे. भाजपाच्या नेत्याने सुरुची झाडे तोडून नेली तर त्याची साधी बातमी नाही आणि शिवसैनिकाने बेकायदा दारु विकली त्याचा फोटो छापला जातो, काही काळजी करू नको, मी तुमच्या पाठीशी आहे, असे वक्तव्य जाधव यांनी केले आहे.
याचबरोबर दोन गोष्टींसाठी मला फोन करू नका. मुलींची छेडछाड आणि चोरी, बाकी कोणत्याही प्रकरणात तुम्ही घाबरू नका, असे भर सभेत सांगत एकप्रकारे गुन्हेगारीलाच प्रोत्साहन दिले आहे. लॉकडाऊन मध्ये दारू विक्री करताना गुहागर पोलिसांनी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर कारवाई केली होती. त्यावर बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी हे वक्तव्य केले.
भाजपावरही टीकाभाजपच्या जीवावर महाराष्ट्रात शिवसेना निवडून आली असे म्हणणाऱ्या भाजप नेत्यांचा भास्कर जाधव यांनी चांगला समाचार घेतला. ते म्हणाले, ज्यांच्याशी मैत्री करायची त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याची भाजपची जुनीच परंपरा आहे. ही परंपरा भाजप नेहमीच पाळत आली आहे. युती असूनही विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्याला कसा दगा दिला हे भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात आज भाजप केवळ बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेमुळेच आहे. तिकडे बिहारमध्ये जाऊन राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही फक्त नरेंद्र मोदी यांना मानतो दुसरं कोणाला मानत नाही. पण बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे नरेंद्र मोदी राजकारणात पुढे आलेत हे विसरून चालणार नाही.आज राम मंदिराची वीट उभारली जाणार असेल तर ती पहिली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने लावली गेली पाहिजे असेही ते म्हणाले.