नवी दिल्ली – देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज दुसरी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी वाजपेयींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे राजकीय जीवन नेहमी आदर्शमय राहिलं आहे. ज्यात त्यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांना सन्मान आणि आदर कायम जपला आहे.
असाच एक मनाला भिडणारा किस्सा अटलबिहारी वाजपेयी(Atal Bihari Vajpayee) यांनी स्वत: त्यांच्या आयुष्यात घडला होता तो अनेकदा सार्वजनिकरित्या जाहीर केला आहे. १९९१ मध्ये जेव्हा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली होती. त्यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी संसदेत विरोधी पक्षनेते होते. तेव्हा एका ज्येष्ठ पत्रकाराने वाजपेयी यांच्याकडे राजीव गांधी यांच्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया मागितली. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी अतिशय भावूक झाले. त्यांनी त्यांच्या अंदाजात एक घडलेला किस्सा पत्रकाराला सांगत मी आज जिवंत आहे ते केवळ राजीव गांधी यांच्यामुळेच अशा शब्दात भावना व्यक्त केली.
ही गोष्ट आहे १९८४-१९८९ दरम्यान..जेव्हा राजीव गांधी(Rajiv Gandhi) देशाचे पंतप्रधान होते आणि अटलबिहारी वाजपेयी हे किडनीच्या आजारामुळे त्रस्त होते. तेव्हा भारतात अशा आजारासाठी उत्तम आरोग्य व्यवस्था उपलब्ध नव्हती. ज्यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांना उपचारासाठी अमेरिकेत जावं लागतं. पण आर्थिक कारणांमुळे वाजपेयी अमेरिकेला जाऊ शकत नव्हते. अटलबिहारी वाजपेयी हा अनुभव सांगताना भावूक झाले होते.
ते म्हणाले की, मी किडनीच्या आजारापासून त्रस्त आहे ही बाब कोणीतरी पंतप्रधान राजीव गांधी यांना सांगितली आणि मला परदेशात उपचारासाठी जाणं गरजेचे आहे हे त्यांना माहिती पडले. एकेदिवशी राजीव गांधी यांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावले आणि सांगितले की, भारताकडून एक शिष्टमंडळ संयुष्ट राष्ट्राला पाठवायचं आहे. मला अपेक्षा आहे की, या संधीचा लाभ घेऊन तुम्ही न्यूयॉर्कमध्ये तुमचा उपचारदेखील कराल. राजीव गांधी यांच्यामुळे मला न्यूयॉर्कला जाता आले. माझा उपचार झाल्याने मी बरा झालो. त्यामुळे त्यांच्यामुळे आज मी जिवंत आहे असं अटलबिहारी वाजपेयींनी सांगितले.
न्यूयॉर्कवरुन परतल्यानंतर ना राजीव गांधींनी ही गोष्ट कोणाला सांगितली, ना मी बोललो. राजकीय आयुष्यात आम्ही कायम एकमेकांच्या विरोधाची भूमिका घेतली. मात्र अटलबिहारी वाजपेयी यांनी काही काळानंतर एका पोस्टकार्डच्या माध्यमातून राजीव गांधींनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले. अटलबिहारी वाजपेयी आणि राजीव गांधी हे दोघंही आज हयात नाहीत. मात्र राजकारणात दिलदार शत्रू कसा असावा हे वाजपेयी आणि राजीव गांधी यांच्या या गोष्टीतून नक्कीच शिकायला मिळतं.