कल्याण - सविनय कायदेभंग आंदोलन प्रकरणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर कल्याण रेल्वे पोलिसांकडून 107 अंतर्गत कारवाई करण्यात आली. या प्रकरणी मंगळवारी (29 सप्टेंबर) कल्याण रेल्वे एसीपी कार्यालयात सुनावणी होती. या सुनावणीसाठी संदीप देशपांडे आज कल्याण रेल्वे एसीपी कार्यालयात हजर झाले होते. यावेळी देशपांडे यांनी "मनसेचंसरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू" असा इशारा ठाकरे सरकारला दिला आहे.
'आम्ही जे आंदोलन केलं ते लोकहितासाठी केलं. कायद्याची प्रोसिजर आता पार पाडत आहोत, मात्र त्यांनी हे लक्षात ठेवावं ज्यावेळेला राज साहेबांचं सरकार येईल तेव्हा हा सर्व हिशोब चुकता होईल. आता जो जो त्रास देताय ते लक्षात ठेवतोय' असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. सामान्यांकरीता रेल्वे सुरू करा यासाठी मनसेने सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली होती. पोलिसांनी आंदोलन करु नका असे सांगून मनसे कार्यकर्त्यांना नोटीस बजावल्या होत्या. अखेर या नोटीसचे उल्लंघन करीत संदीप देशपांडे यांनी कार्यकर्त्यांसह रेल्वेने प्रवास केला होता.
"हॉटेल सुरू करण्याचे संकेत दिले, लोकांनी आकाशात उडत कामावर यायचं का?"
राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा बंद असताना हॉटेल सुरू करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाच्या अनुषंगाने मनसेने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
मनसेने ठाकरे सरकारला लगावला टोला
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मंगळवारी (29 सप्टेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "#Unlock5 सुरू होणार आहे मुख्यमंत्रांनी संकेत दिले की उपहार गृह सुरू करणार आहेत. तिथे काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय? की त्यांनी आकाशात उडत कामावर यायचं???????" असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. याआधी काही दिवसांपूर्वी देशपांडे यांनी सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा सुरू करा या मागणीसाठी सविनय कायदेभंग केला होता.