मुंबई: भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात भाजपामधून केली आहे. मागील अनेक वर्षांपासून ते पक्षासाठी काम करत आले आहेत. राजकारणाची एक-एक पायरी चढत त्यांनी तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अर्थमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. दरम्यान, अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांना त्यांच्याच एका चित्रपटातील डायलॉग एकवला होता. लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला आहे.
'त्या वेळे देवेंद्र फडणवीस यांना अर्थमंत्री व्हायचं होतं...'
लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी फेस टू फेस या कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत घेतली. यावेळी मुनगंटीवार यांनी त्यांच्या शालेय आणि कॉलेज जीवनातील विविध आठवणींना उजाळा दिला. सुधीर मुनगंटीवार यांना गाण्याची आवड आहे, हे अनेकांनाच माहित आहे. हाच धागा पकडून मुलाखतीत अतुल कुलकर्णी यांनी मुनगंटीवारांना त्यांच्या शालेय आणि कॉलेज जीवनातील काही आठवणी आणि गॅदरिंगमधील सहभागाविषयी प्रश्न विचारला. तसेच, त्यांना त्यांच्या आवडत्या चित्रपटातील एखादा डायलॉग बोलण्याची विनंती केली. त्यावर सुधीर मुगंटीवार म्हणाले की, 'आम्ही गॅदरिंगमध्ये नेहमी सहभाग घ्यायचो. अमिताभ बच्चन आमच्यासाठी मोठे नायक होते. मी अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांना त्यांच्याच 'त्रिशूल' चित्रपटातील एक डायलॉग एकवला होता.'
मुनगंटीवार पुढे म्हणाले की, 'अर्थमंत्री झालो होतो तेव्हा राज्याच्या तिजोरीत पैसे नव्हते. सर्वत्र खनखनाट होता. मूळात मंत्रालयात तिजोरी ही प्रतक्षात नसतेच, हा फक्त बोलण्याचा एक भाग झाला. एके दिवशी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक बैठक होती, तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की, राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत. 'मेरे जेब मे फुटी कवडी नही, पर मै पांच लाख का सौदा करणे आया हू सेठ...' हा त्यांच्या त्रिशूल मधला डायलॉग त्यांना ऐकवला होता. त्यावर ते खूप हसले होते. याशिवाय, हमारे तिजोरी मे पैसे नही, पर मै जनता के कष्ट दुर करणे के लिये पैसे कम गिरणे नही दूंगा, असं अमिताभ यांना म्हटलं होतं. त्यावर अमिताभ यांनी एकही पैसा न घेता आमच्या विभागाचे ब्रँड अँबेसेडर झाले होते, अशी माहिती त्यांनी दिली.