मुंबई – शहरातील कराची स्वीट्स दुकानाचं नाव बदलण्याची मागणी शिवसेनेच्या नितीन नांदगावकर यांनी केली, कराची स्वीट्स या नावामुळे देशातील सैनिकांचा अपमान होतो असं नितीन नांदगावकर यांचे म्हणणं होतं, त्यासाठी नांदगावकर यांनी कराची स्वीट्सच्या दुकानात जाऊन तेथील मालकांना याबाबत निवेदन देत समज दिली होती, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर त्या घटनेवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
यात काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी ट्विट केलं की, भारतात चायनीज हॉटेलचा चीनशी काही देणंघेणं नाही, तसेच वांद्रे येथील कराची स्वीट्सचं पाकिस्तानशी कोणतंही नातं नाही. हे सत्य शिवसेनेच्या मुर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार? ७० वर्ष जुन्या दुकानाचं नाव बदलण्याची धमकी दिली जाते, हे चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांनी तमाशा बघू नये, त्यांची रक्षा करावी असं म्हटलं.
तर कराची नाव बदला ही भूमिका शिवसेनेची नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले. कराची बेकरी आणि कराची स्वीट्स या ६० वर्षांपासून मुंबईत आहेत. त्यांचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या दुकानाचे नाव बदलण्याची मागणी करण्यात अर्थ नाही असं त्यांनी सांगितले.
काय आहे वाद?
कराची बेकरी, कराची स्वीट, कराची स्कूल अशी नावे मुंबईत चालणार नाहीत. पंधरा दिवसांत कराची नाव असलेल्या पाट्या बदला, असा इशारा शिवसेनेच्या नितीन नांदगावकर यांनी दुकानदारांना दिला होता. त्यावरून राजकीय घमासान सुरू झालेले असतानाच कराची नाव बदला, ही शिवसेनेची भूमिका नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. वांद्रे येथील कराची बेकरीचे नाव बदलण्याची मागणी नांदगावकर यांनी गुरुवारी केली. कराची हे नाव पाकिस्तानमधील आहे आणि या नावामुळे आपल्या सैनिकांचा अपमान होत असल्याचा दावा त्यांनी केला. देशातील प्रमुख शहरांसह मुंबईत अनेक ठिकाणी कराची बेकरी आणि स्वीट्सच्या शाखा आहेत. यातील कराची या शब्दावर नांदगावकरांनी आक्षेप घेतला. त्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेना कार्यकर्त्यांवर बोचरी टीका केली आहे.