केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्यात शिवसैनिकांकडून ठिकठिकाणी राणेंविरोधात जोरदार निदर्शनं केली जात आहेत. तर काही ठिकाणी भाजपच्या कार्यालयांवरही दगडफेक करण्यात आली आहे. मुंबईत तर राणे समर्थक आणि युवासेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याची घटना घडली आहे. शिवसैनिक चांगलेच संतप्त झालेले असताना शिवसेनेचे आक्रमक नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही याप्रकरणावर भाष्य केलं आहे.
"केंद्रीय मंत्री असो किंवा बादशहा असो कारवाई ही होणारच", असा स्पष्ट इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे राणेंविरोधात नेमकी कोणती कारवाई केली जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
'सिद्धपुरुष बाळासाहेबांनी राणेंना शाप दिलाय'; राणेंच्या 'त्या' विधानावर भास्कर जाधवांचा खोचक टोला
"तुम्ही ज्या शाळेत शिकला आहात ती शाळा आजूनही अबाधित आहे हे लक्षात ठेवावं", असं म्हणत संजय राऊत यांनी शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेचं समर्थन केलं आहे.
दरम्यान, राणेंच्या विधानानंतर वातावरण चांगलंच तापलेलं असताना राज्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन भाजपाची भूमिका स्पष्ट केली. राणेंच्या त्या विधानाशी भाजपा सहमत नाही, पण भाजपा राणेंच्य पाठिशी ठामपणे उभी आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत. नारायण राणे सध्या चिपळूणमध्ये असून ते जनआशीर्वाद यात्रा करत आहेत. यावेळी राणेंसमोरच शिवसेना समर्थकांनी घोषणाबाजी आणि निदर्शनं केली.
राणेंच्या राजीनाम्याची मागणीशिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मुख्यमंत्र्यांबाबत खालच्या पातळीवर टीका कलेल्या राणेंना मंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. केंद्रात आपलं सरकार असल्याचं सांगून नारायण राणे जर राज्यात नंगा नाच घालत असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहन करतील असं वाटत नाही. ते नक्कीच राणेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतील, असं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत.