" एकटं यायचं की आघाडी करून हे आमचे वरिष्ठ ठरवतील; आम्हाला कुणी बिनकामाचा सल्ला देऊ नये..."
By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: December 4, 2020 03:30 PM2020-12-04T15:30:55+5:302020-12-04T15:49:17+5:30
आम्हाला कुणी बिन कामाचा सल्ला देण्याची काहीही आवश्यकता नाही...
पुणे : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुका पार पडल्या. यात महाविकास आघाडीने भाजपाला अनेक ठिकाणी चितपट केले होते. यानंतर महाविकास आघाडीतील नेते व भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे.महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी एक एकट्याने आमच्याशी लढावे असे खुले आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्याला आता राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटलांनाच खडे बोल सुनावले आहे.
राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक निकालांमध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला जोरदार धक्का देत घवघवीत यश मिळवले आहे. तर दुसरीकडे पुणे, नागपूर या बालेकिल्ल्यांसह औरंगाबादमध्येही भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. आता या धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपला लक्ष्य केले जात आहे. आता अजित पवारांनी भाजपवर टीका केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले, आम्ही आघाडी करून लढायचे की एक एकट्याने या संबंधीचा निर्णय आघाडीतील सहभागी पक्षांचे वरिष्ठ नेते ठरवतील. आम्हाला कुणी बिन कामाचा सल्ला देण्याची काहीही आवश्यकता नाही. एकत्रितपणे लढण्याचे परिणाम या निवडणुकीच्या निकालातून समोर आले आहे. सर्वच मतदारसंघात आघाडीतील पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांनी एकत्रित पणे काम केले. त्यामुळे पुढील काळात अधिकाधिक आघाडीचा आमचा प्रयत्न असणार आहे. आमच्या वेगळे लढण्याने जर विरोधकांचा फायदा होणार असेल तर तसे अजिबात होता कामा नये.
माझ्यासारख्या माणसाने खुल्या दिलाने पराभव मान्य केला असता..
आम्ही पराभव स्वीकारतो आणि चिंतन करतो, अशी भूमिका चंद्रकांत दादांनी करणे अपेक्षित होते. मात्र ते दावे करीत आहे. माझ्यासारखा माणूस जर त्यांच्या जागी असता तर खुल्या मनाने पराभव मान्य केला असता. तसेच आम्हाला आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आम्हाला एवढा दारुण पराभव का झाला याचं चिंतन करुन वगैरे वगैरे. पण तो देखील दिलदारपणा दाखवण्याची दानत त्यांच्या लोकांची नाही. परंतु, ठीक आहे, त्यांचे त्यांना लखलाभ”अशा शब्दात अजित पवार यांनी भाजपावर हल्लाबोल केला.