Maha Vikas Aghaid Seat Sharing Update: महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असतानाचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि काँग्रेसमध्ये तणातणी झाली. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांसोबत जागावाटपाची चर्चा करणार नाही, अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेने घेतली. त्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि चर्चा पुन्हा सुरू झाली. पण, मूळ मुद्दा आहे, तो ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात आहे, ज्या काँग्रेस सोडायला तयार नाही?
ठाकरेंचा विदर्भात जागांसाठी आग्रह
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत विदर्भातील काही जागा हव्या आहेत. शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत रामटेक आणि अमरावती हे दोन मतदारसंघ काँग्रेसला दिले होते. त्यावरच बोट ठाकरेंच्या शिवसेनेने नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण मधील जागा हवी आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेने रामटेक विधानसभा मतदारसंघ आणि नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची जागा मागितली. या दोन्ही जागा काँग्रेसने देण्यास नकार दिला. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटपाचा पेच वाढला.
ठाकरेंना विदर्भातील कोणत्या १२ जागा हव्या आहेत?
विदर्भामध्ये विधानसभेच्या ६२ जागा आहेत. विदर्भात पक्ष विस्तार करण्यासाठी ठाकरेंनी विदर्भातील १२ जागांवर दावा केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेक, कामठी, नागपूर दक्षिण, वरोरा, आरमोरी, भंडारा, बुलढाणा, सिंदखेडराजा, आरणी, वर्धा यवतमाळ, दिग्रज या जागा ठाकरेंच्या शिवसेनेने मागितल्या आहेत.
मुंबईतील जागांबद्दलही पेच
मविआमध्ये मुंबईतील तीन जागांवरूनही तिढा आहे. वर्सोवा, भायखळा आणि धारावी या मतदारसंघांचा मुद्दा आहे. या मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केला आहे. वर्सोवा, भायखळा आणि घाटकोपर पश्चिम या मतदारसंघांवर ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केलेला आहे.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे भायखळा, मानखुर्द शिवाजीनगर वर्सोवा आणि अणुशक्ती नगर या जागांवर समाजवादी पक्षाने दावा केला आहे. यात महत्त्वाचा पेच म्हणजे यातील काही जागांवर काँग्रेसने उमेदवारांची नावेही जवळपास निश्चित केली असल्याचे समजते.
यातील काही जागांवर काँग्रेसचा उमेदवार राहिलेला आहे, तर काही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आलेली आहे. यात रामटेक, नागपूरमधील मतदारसंघ देण्यास काँग्रेस तयार न झाल्याने ही जागावाटपाच्या चर्चेत तणाव निर्माण झाला होता.
त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे रमेश चेन्निथला यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर चेन्निथला हे शरद पवारांनाही भेटले. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
आतापर्यंतच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीचे २५०-२६० जागांवर एकमत झाले असून, उर्वरित जागांवर दोन आणि दोनपेक्षा जास्त पक्षांनी दावे केले आहेत. त्यामुळे हा तिढा असून, त्यावर आता चर्चा सुरू झाली आहे.