मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमधील जुगलबंदी अद्यापही संपली नाही. एम्सच्या रिपोर्टनुसार सुशांत सिंहची हत्या नसून आत्महत्याच आहे असं सीबीआयला सांगितल्याची माहिती आहे. यावरुन सत्ताधारी नेत्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. त्याला विरोधकांनीही सडेतोड उत्तर दिलं आहे.
या प्रकरणात भाजपा आमदार राम कदम यांनी म्हटलंय की, सामनाकार शिवसेना नेत्यांनी सुशांत आणि त्याच्या कुटुंबाला बदनाम आणि अपमानित करण्याची सुपारी घेतल्याचं दिसतंय? ७४ वर्षाच्या म्हाताऱ्या सुशांतच्या वडिलांना आणि कुटुंबीयाना वारंवार शिवसेना नेत्यांनी अपमानित केलं. देवाघरी गेलेल्या सुशांतला देखील मेल्यानंतर सुद्धा शिवसेना नेते बरे वाइट बोलायला मागेपुढे पाहत नाहीत. अत्यंत वाईट शब्दात अपमानित करतात, मृत्युनंतर शत्रूला देखील बरं वाईट बोलू नये हां हिंदू धर्मातला संस्कार शिवसेना नेते सामनाकार राजकारणाच्या स्वार्थापोटी विसरले असा टोला संजय राऊतांना नाव न घेता लगावला आहे.
तसेच सामनाकार स्वार्थापोटी विसरले दुद्रैव सीबीआय तपास अजून पूर्ण झाला नाही त्याच्या आधीच आत्मसाक्षात्कार आशीर्वाद प्राप्त झालेले महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना नेते सुशांत सिंह राजपूत बाबतीत चोकशी पूर्ण होण्याआधीच निष्कर्षापर्यंत येतात याचं आश्चर्य कमी पण त्यांना कुणाला वाचवायचं आहे? हा प्रश्न अधिक पडतो अशा शब्दात भाजपा आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
राम कदम यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं
सुशांत सिंह प्रकरणावरुन भाजपा आमदार राम कदम यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिलं होतं, त्यात म्हटलं होतं की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे ६५ दिवस होता. या काळात रिया चक्रवर्तीच्या मोबाईलमधील ड्रग्स संदर्भातील गंभीर व्हॉट्सअप चॅट उपलब्ध असतात महाराष्ट्र सरकारने याकडे दुर्लक्ष करण्याचं कारण काय होतं? ६५ दिवसांमध्ये एकालाही अटक केली नाही, संपूर्ण देशाच्या युवा पिढीच्या दृष्टीकोनातून ड्रग्स हा विषय अंत्यत गंभीर आहे तो महाराष्ट्र सरकारच्या नजरेतून सुटला? का मुद्दामून त्याकडे दुर्लक्ष केले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
तर या प्रकरणात बड्या बड्या लोकांना वाचवण्याच्या कसरतीमध्ये महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष दिले नाही, अशी देशातील कोट्यवधी जनतेची मानसिकता आहे. म्हणूनच ६५ दिवसांमध्ये कोणाची अटक नाही किंबहुना ड्रग्सचा विषय समोर आला नाही हा दाबण्याचा प्रयत्न का केला? ६५ दिवसांनी हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांकडे गेल्यानंतर ड्रग्स प्रकरणात १९ पेक्षा अधिक जणांना तुरुंगात जावं लागले. रिया चक्रवर्तीचे प्रवक्ता म्हणून सरकारचे नेते आणि सरकार वागत होते तिलाही तुरुंगात जावं लागतं हे सर्व देशाने पाहिलं असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला होता.
राष्ट्रवादी आमदारांनी भाजपा नेत्यांवर केली होती टीका
सुशांत सिंह प्रकरणात एम्सच्या डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतर सत्ताधारी नेत्यांकडून विरोधकांवर टीका करण्यात येत आहे. सुशांत सिंहची हत्या नसून आत्महत्या आहे असं एम्सने सीबीआयला रिपोर्ट दिल्याचं सांगितलं गेलं, त्यानंतर सत्ताधारी नेते आक्रमक झाले, याप्रकरणी आमदार रोहित पवार, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा नेत्यांना टोला लगावला होता. सुशांत प्रकरणात काही न्यूज चॅनेल्स,मराठी भैय्ये आणि BJPच्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली.आता CBIने मान्य केलं आहे की,सुशांतने आत्महत्याच केलीय. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे "मराठी भैय्ये" आता माफी मागणार का? असा सवाल करत आव्हाडांनी भाजपा नेत्यांना घेरलं तर बिहार निवडणुकीसाठी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर एम्सच्या अहवालाने पाणी फिरलंय, मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी असं रोहित पवार म्हणाले होते.