- श्रीनिवास नागेलोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असली तरी सांगली मतदारसंघात काँग्रेसला अद्याप तगडा उमेदवार मिळालेला नाही. भाजपाने मात्र विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्याच नावावर पुन्हा शिक्कामोर्तब करून यंत्रणेला वेग दिला आहे. या मतदारसंघात सांगली, मिरज, जत, तासगाव-कवठेमहांकाळ, पलूस-कडेगाव व खानापूर हे विधानसभा मतदारसंघांचा येतात. मोदी लाटेत २०१४ मध्ये काँग्रेसचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला. त्यावेळी संजयकाका पाटील यांनी भाजपचा झेंडा घेऊन कमळ फुलवले. त्यानंतर जिल्ह्यात भाजपाचे चार आमदार निवडून आले. पाठोपाठ भाजपाने जिल्हा परिषद, काही नगरपालिकांसह महापालिकेची सत्ताही काबीज केली आणि तो पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला.खा. पाटील यांनी गेल्या वर्षापासूनच पुन्हा लढण्याची तयारी सुरू केली होती. मध्यंतरी ते भाजपावर नाराज होते. मात्र भाजपाने कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद देऊन त्यांची नाराजी दूर केली. त्यानंतर पक्षांतर्गत विरोध असतानाही खा. पाटील यांनी जनसंपर्क वाढवून स्वत:च्या गटाच्या बांधणीला प्राधान्य देत जिल्हा पिंजून काढला. विशेषत: मिरज, जत, तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यांवर लक्ष केंद्रित केले. सिंचन योजनांच्या कामांना महत्त्व देऊन विविध कार्यक्रम आयोजित केले. जिल्ह्यातून जाणारे नवे राष्टÑीय महामार्ग आणि ड्रायपोर्टच्या पाठपुराव्याचे मार्केटिंग केले.आजच्या घडीला भाजपाकडे संजयकाका यांच्याखेरीस दुसरा पर्याय नाही. काँग्रेस आघाडीत मात्र अजूनही तगड्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे प्रमुख इच्छुक दिसत आहेत. मागील पराभवानंतर प्रतीक पाटील पक्षाचे कार्यक्रम, मोर्चे-आंदोलने तसेच कार्यकर्त्यांपासून दूर होते. त्यामुळे माजी प्रदेशाध्यक्ष गुलाबराव पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील यांची दावेदारी प्रबळ ठरताना दिसत आहे.पतंगराव कदम, मदन पाटील यांच्या निधनानंतर जिल्ह्यात काँग्रेसला खमके नेतृत्व मिळालेले नाही. भाजपाला टक्कर देण्यासाठी आ. विश्वजीत कदम व माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांचीही नावे पुढे आली. मात्र त्यांचे लक्ष्य विधानसभाच असल्याने दोघांनीही लोकसभा लढविण्यास नकार दिला. राष्टÑवादीची सर्व सूत्रे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आहेत. त्यांची मदत निर्णायक ठरणारी असेल. मात्र आघाडी असली तरी वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील उमेदवाराला ते कितपत स्वीकारतील, हाही प्रश्न आहे.खा. राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांना उतरवण्याची तयारी सुरू केली असली, तरी महाआघाडीत ही जागा कुणाला सुटते, यावर सगळे अवलंबून आहे.>सध्याची परिस्थितीपक्षापेक्षा स्वत:च्या गटाच्या मजबुतीवर भर, जवळच्या कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी निष्ठावानांचा घेतलेला राजकीय बळी, जुन्यांची अवहेलना, पारदर्शीपणाचा अभाव, सतत सोयीचे राजकारण, एकहाती हुकूमत ठेवण्याची खुमखुमी यामुळे खा. संजयकाका पाटील यांनी भाजपमधील अनेक नेत्यांना दुखावले आहे. लोकसभा मतदारसंघातील तीनपैकी दोघा भाजपच्या आमदारांचे खा. पाटील यांच्याशी सख्य नाही. शिवसेनेच्या आमदारांशी तर त्यांचा उभा दावा आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना ते जुमानत नाहीत, तर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याशी त्यांचे सुरुवातीपासूनच फाटले आहे. असे असले तरी सद्य:स्थितीला भाजपकडे संजयकाका पाटील यांच्याव्यतिरिक्त जिल्हाभरात चालणारा हिकमती उमेदवार नाही.काँग्रेस-राष्टÑवादीतील दिग्गज नेत्यांनी भाजप प्रवेश केल्याने आघाडी खिळखिळी झाली असली तरी पारंपरिक मतदार, सहकारी संस्था आणि कट्टर कार्यकर्त्यांचे बळ ही काँग्रेस-राष्टÑवादीची जमेची बाजू आहे. त्यातच जिल्ह्यात अनुकूल वातावरण तयार झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी उभारी घेतली आहे. मात्र उमेदवारच ठरत नसल्याने आघाडीत गोंधळाचे चित्र कायम आहे.
तगड्या उमेदवाराचा काँग्रेसकडून शोध, संजयकाका पाटील यांना आव्हान कोणाचे?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 6:23 AM