नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन या माथाडी कामगारांच्या राज्यातील सर्वात मोठ्या संघटनेच्या नेत्यांमध्ये राजकीय मतभिन्नता निर्माण झाली आहे. संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट केले आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. दोन प्रमुख नेत्यांमधील राजकीय मतभिन्नतेमुळे कामगारांमध्येही संभ्रमाची अवस्था निर्माण झाली असून कोणता झेंडा घ्यायचा हाती, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख कामगार संघटनांमध्ये अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचा समावेश आहे. राजकीय दृष्टिकोनातूनही या संघटनेला विशेष महत्त्व आहे. संघटनेच्या स्थापनेपासून अनेक वर्षं काँग्रेससोबत व नंतर राष्ट्रवादीसोबत कामगार व नेते एकनिष्ठपणे कार्यरत होते. पुणे, सातारा, नवी मुंबई परिसरातील अनेक विधानसभा मतदारसंघांत कामगारांची मते निर्णायक ठरतात. यामुळे यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे अनेक निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ माथाडी मेळाव्यातून फोडत असत. माथाडी संघटनेचे कार्याध्यक्ष शशिकांत शिंदे सुरुवातीला जावली व नंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. मागील निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेवर घेतले आहे. संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनाही विधान परिषदेवर संधी दिली होती; परंतु यापूर्वीच्या भाजप सरकारच्या काळात नरेंद्र पाटील यांची भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली. फडणवीस यांच्या सांगण्यावरून त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर सातारा लोकसभेची निवडणूक लढविली होती. व आता शिवसेनेशी नाते तोडून त्यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांचेच निष्ठावंत असल्याचे स्पष्ट केले आहे.
माथाडी संघटनेमध्ये अनेक वर्षांपासून शिंदे व पाटील यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते. त्याविषयी अनेक वेळा कामगारांमध्ये चर्चा सुरू असायच्या. परंतु राजकीय दृष्टीने दोन्ही नेेते राष्ट्रवादीमध्येच कार्यरत होते. यामुळे कामगारांमध्येही संभ्रम नसायचा. आता एक नेता राष्ट्रवादीमध्ये व एक भाजपमध्ये असल्यामुळे कामगारांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. लवकरच नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची जबाबदारी राष्ट्रवादीने आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर सोपवली आहे.
माथाडी कामगारांच्या ताकदीच्या बळावरच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे; परंतु आता दोन्ही प्रमुख नेत्यांच्या राजकीय भूमिकेमुळे माथाडींची ताकद विभागली जाणार आहे. कामगारांमध्येही कोणता झेंडा घ्यायचा हाती, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
महानगरपालिका निवडणुकीत लागणार कसोटी माथाडी संघटनेच्या दोन प्रमुख नेत्यांपैकी नरेंद्र पाटील हे भाजपमध्ये व शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे काम करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या दोन्ही नेत्यांपैकी कामगार नक्की कोणाच्या बाजूला उभे राहणार याविषयी उत्सुकता लागली आहे. महानगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही नेत्यांची कसोटी लागणार आहे. नेत्यांमधील राजकीय मतभिन्नतेचा कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयोग होणार की प्रश्न तसेच राहणार याविषयीही तर्क-वितर्क लढविले जात आहेत.