नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपाविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. आज कृषी कायद्यांवरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारला टीकेचे लक्ष्य केले. तसेच चीनच्या मुद्यावरून सवाल विचारणारे भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनाही राहुल गांधी यांनी टोला लगावला आहे. नड्डा यांनी विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर द्यायला ते काय माझे शिक्षक आहेत का? मी का त्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊ, असा टोला त्यांनी लगावला.भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी चीनच्या विषयावरून राहुल गांधी यांनी खोटं बोलणं बंद करावं, असा सल्ला देत नड्डा यांनी काही प्रश्न विचारले होते. त्याबाबत राहुल गांधीना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, जे. पी. नड्डा हे काय माध्ये शिक्षक आहेत का. ते कोण आहेत ज्यांच्यासाठी मी उत्तरं देत फिरू. मी देशातील शेतकरी, देशातील जनतेला उत्तरे देईन. आपला आवाज उठवत राहीन. मग मला कितीही विरोध झाला तरी चालेल.यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टोला लगावला. पंतप्रधानांपेक्षा अधिक समज ही देशातील शेतकऱ्यांना आहे. काय चाललंय आणि काय नाही हे त्यांना समजतं. हेच सत्य आहे आणि यावरील एकमेव उपाय म्हणजे तीनही काळ्या कायद्यांना मागे घ्यावं, असे राहुल गांधी म्हणाले.ज्यावेळी यूपीएचं सरकार सत्तेवर होतं, तेव्हा या सरकारने शेतकऱ्यांचं लाखो कोटींचं कर्ज माफ केलं होतं. भट्टा परसोलचा विषयसुद्धा यूपीए सरकार सत्तेत असतानाच उपस्थित करण्यात आला होता, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.