सोलापूरात शिंदेंविरुद्ध भाजपाकडून कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 06:46 AM2019-03-12T06:46:45+5:302019-03-12T06:47:09+5:30
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे सर्वांसमोर पेच
सोलापूर : गेल्या १५ वर्षांत आलटून-पालटून कौल देणाऱ्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक गाजणार आहे. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करून भाजपचे खासदार शरद बनसोडे निवडून आले. यंदा सुशीलकुमार शिंदे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले असून, त्यांच्याविरोधात भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, पंढरपूर विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यातील मोहोळ मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर पंढरपूर, शहर मध्य, अक्कलकोट हे मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. शहर उत्तर आणि शहर दक्षिण मतदारसंघ भाजपकडे आहेत. सोलापूर शहर हे बहुभाषिक लोकांचे शहर म्हणून ओळखले जाते. गेल्या १५ वर्षांत सोलापूर लोकसभा मतदारसंघ दोनवेळा भाजपकडे तर दोनवेळा काँग्रेसकडे राहिला आहे. यंदाच्या निवडणुकीत युवा मतदारसंघाची संख्या वाढली आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही या मतदारसंघातील लढत रंगणार आहे.
जयसिद्धेश्वर महास्वामी की अमर साबळे
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याविरुध्द भाजपाकडून खासदार अमर साबळे यांचे नाव चर्चेत आहे. अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांचेही नाव चर्चेत आले असून त्यांनी वेगवेगळ््या मठांमध्ये बैठका सुरू केल्या आहेत. भाजपा नेते कोणाला पसंती देतात यावर जोरदार चर्चा सुरू आहे.