भिवंडी : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या सहीने देशात चलनी नोटा चालवल्या जात असताना, मोदींना नोटा रद्द करण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न करत बहुजन वंचित आघाडीचे नेते व भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भिवंडीतील जाहीर सभेत सरकारवर टीका केली.भिवंडीतील टावरे स्टेडियम येथे शुक्रवारी झालेल्या या सभेमध्ये एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी, आ. वारीस पठाण, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अरुण सावंत आदी उपस्थित होते. अॅड. आंबेडकर म्हणाले की, या मतदारसंघातून मुंबईला पाणी जाते; परंतु येथील विधानसभा क्षेत्रात पाण्याचे प्रश्न तसेच आहेत. शहरातील यंत्रमाग व्यवसायाला चालना देण्यासाठी पूर्वीच्या काँग्रेस व भाजपच्या खासदारांनी आतापर्यंत काहीच प्रयत्न केले नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी उपस्थितांना खिशातील १०रु पयांची नोट बाहेर काढून, नोटाच्या मागील मजकूर वाचण्यास सांगितले. नोटांवरील गव्हर्नरांचा संदेश त्यांनी भरसभेत वाचला व प्रतिप्रश्न केला की, जर गव्हर्नरांच्या सहीने नोटा चलनात आणल्या जातात, तर नोटा रद्द करण्याचा अधिकार मोदींना कोणी दिला असा सवाल केला.साध्वी प्रज्ञांना हद्दपार करण्याचे आवाहननरेंद्र मोदी यांनी लोकसभेत १० टक्के आर्थिक निकषांवर घेतलेला आरक्षणाचा विषय असो किंवा ट्रिपल तलाकचा विषय असो, त्यास विरोध करण्यासाठी कोणी सहकारी नव्हते. त्यासाठी मुस्लिम व अनुसूचित जातींच्या हक्काच्या संरक्षणासाठी आपल्या विचारांचे संसदेत खासदार पाठवणे जरुरीचे आहे, असे असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळी सांगितले. अभिनेता अक्षयकुमार याने घेतलेल्या मोदींच्या मुलाखतीची त्यांनी खिल्ली उडवली. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल अपशब्द वापरले. मात्र भाजप अशा व्यक्तींवर कारवाई करत नाही. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे अशा देशद्रोही प्रवृत्तींना मतदारांनी हद्दपार केले पाहिजे, असे आवाहन ओवेसी यांनी केले.
'मोदींना नोटा रद्द करण्याचा अधिकार कोणी दिला?'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 1:45 AM